"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 02:22 PM2024-05-04T14:22:04+5:302024-05-04T14:29:14+5:30
Ajit Pawar : रशिया युक्रेन युद्धाबाबत बोलताना अजित पवार यांनी साताऱ्याच्या सभेत पंतप्रधान मोदींचे कौतुक केलं आहे.
Satara Loksabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. महायुतीचे नेते तुमचं हे उमेदवाराला नसून पंतप्रधान मोदी यांना आहे असं सांगत प्रचार करत आहेत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांकडून थेट पंतप्रधान मोदींच्या नावावर मतं मागितली जात आहेत. साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कामाचे जोरदार कौतुक केलं. भाजप नेत्यांप्रमाणेच अजित पवार यांनीही पंतप्रधान मोदी यांच्या फोननंतर रशिया युक्रेनचं युद्ध थांबल्याचे म्हटलं आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळ युद्ध थांबवल्याचा दावा भाजप नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करण्यात येत आहे. यातच आता अजित पवार यांचीही भर पडली आहे. साताऱ्यातल्या प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी याचा उल्लेख केला. मुलांना युद्धातून बाहेर काढण्यासाठी मोदींना फोन केल्यानंतर त्यांनी तुम्ही काळजी करु नका असं म्हटल्याचे अजित पवार म्हणाले.
"दहा वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदी यांच्यावर शितोंडा उडवण्याचे कोणाचेही उदाहरण दाखवता येणार नाही. आपल्या शेजारी पाकिस्तान कुरघोड्या करायचंय. पुलवामाला असा दणका दिला की पुन्हा पाकिस्तानाने आपल्याकडे पाहिलं नाही. गप गार बसला आहे.ज्यावेळेस आमची भारतातील मुलं मुली शिकायला युक्रेनला गेली होती. त्यावेळी रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरु झालं. तेव्हा रशियाचा मेन माणूस पुतीन. युद्ध सुरु झाल्यानंतर आमच्याकडे फोन यायला लागले की आमची मुलं तिथे शिक्षणासाठी गेले आहेत. आम्ही पंतप्रधान मोदींशी संपर्क साधल्यावर मोदींनी तुम्ही काळजी करु नका असं म्हटलं. तुम्ही चाट पडाल पण युक्रेनचं युद्ध थांबवण्यासाठी मोदींनी पुतीन यांना फोन लावला आणि सांगितलं की भारतातील मुलं तिथं आहेत त्यामुळे तेवढ्या काळापुरतं युद्ध थांबवा. त्यामुळे युद्ध थांबलं आणि विशेष विमानं पाठवून सगळ्यांना सुरक्षित त्यांच्या जागी पोहोचवलं. हे येड्या गबाळ्याचे काम नाही. त्यासाठी धडाकेबाज नेता लागतो," असं अजित पवार म्हणाले.
संरक्षणमंत्र्यांनीही सांगितला होता किस्सा
देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही रशिया युक्रेन युद्धाबाबत एका प्रचारसभेत भाष्य केलं होतं. "जेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू होते, त्यावेळी अनेक भारतीय मुले युक्रेनमध्ये शिकत होती. त्यानंतर मुलांच्या पालकांनी त्यांना युक्रेनमधून परत आणण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींना केले होते. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षणाचाही विलंब न लावता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना फोन केला. त्यानंतर साडेचार तास युद्ध थांबले आणि भारताचे लोक परतले, असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं.