“राहुल गांधी संविधान घेऊन सगळीकडे जातात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत”; कुणी केली टीका?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 08:06 PM2024-12-02T20:06:08+5:302024-12-02T20:21:55+5:30
Veer Savarkar Defamation Case On Rahul Gandhi: दोनदा समन्स बजावले, राहुल गांधी गैरहजर राहिले; आता अटक वॉरंट निघणार? नेमके प्रकरण काय?
Veer Savarkar Defamation Case On Rahul Gandhi: वीर सावरकर यांच्याबद्दल बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. परंतु, समन्स बजावूनही राहुल गांधी उपस्थित राहत नसल्यामुळे आता कठोर कारवाई करण्याची मागणी न्यायालयाला करण्यात आली आहे. यामुळे राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात, असे सांगितले जात आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावणीस हजर होण्यासाठी १० जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
राहुल गांधी हे विद्यमान खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत. देशातील विविध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते देशभर दौऱ्यावर होते. येथील न्यायालयाचे समन्स त्यांना मिळाले आहे. मात्र, दौऱ्यामध्ये व्यस्त असल्याने ते न्यायालयात हजर राहू शकत नाहीत, असे राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यामुळे न्यायालयाने यापूर्वीच्या सुनावणीत मुदतवाढ दिली होती. तर, सध्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. अनेक महत्त्वपूर्ण विधेयके संसदेत चर्चेसाठी येणार आहेत. राहुल गांधी हे एका महत्त्वाच्या पदावर असल्याने त्यांनी लोकसभेच्या अधिवेशनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे गांधी यांना न्यायालयात गैरहजर राहण्याची परवानगी मिळून न्यायालयात उपस्थित राहण्यास मुदतवाढ मिळावी, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला होता. त्यानुसार हजर राहण्याबाबत पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे, अशी माहिती राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी दिली आहे.
सात्यकी सावरकर यांनी दिली महत्त्वाची माहिती
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा चुलत नातू आणि नारायण सावकर यांचा सख्खा नातू सात्यकी सावरकर यांनी याबाबत माहिती दिली. पत्रकारांशी बोलताना सात्यकी सावरकर म्हणाले की, वीर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणात २०२३ मध्ये मी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केलेला आहे. यासंदर्भात आज एक सुनावणी झाली. मागील सुनावणीवेळी न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले होते. ०२ डिसेंबरला राहुल गांधी यांनी न्यायालयात उपस्थित राहावे, अशी ऑर्डरही काढली होती. परंतु, संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे राहुल गांधी उपस्थित राहू शकले नाही, असा बचाव त्यांच्या वकिलांनी केला, अशी माहिती सात्यकी सावरकर यांनी दिली.
संविधान घेऊन सर्व सभांमध्ये जातात, पण न्यायालयाचे आदेश पाळत नाहीत
वीर सावरकर यांची बदनामी ही आमच्या संपूर्ण सावरकर कुटुंबासाठी चिंतेची बाब आहे. गंभीर बाब आहे. ही बाब आम्ही गांभीर्याने घेतलेली आहे. वीर सावरकर यांचे समर्थक आहेत, त्यांच्या तीव्र भावना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. समन्स बजावूनही राहुल गांधी न्यायालयासमोर येत नसतील, तर ते जे संविधान घेऊन सर्व सभांमध्ये जात असतात. सगळ्या सभांमध्ये संविधानाच्या बाजूने बोलत असतात. संविधानरक्षक सभा घेतात. त्याला काहीही अर्थ उरत नाही. न्यायालय हा लोकशाहीचा स्तंभ आहे. न्यायपालिकेचा आदर आपण केला पाहिजे. परंतु, राहुल गांधी यांच्या वर्तनावरून असे दिसून येत आहे की, न्यायालयाचे आदेश ते पाळत नाहीत, अशी टीका सात्यकी सावरकर यांनी केली.
दरम्यान, राहुल गांधी न्यायालयात हजर झाले नाहीत म्हणून त्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढावे, तसेच कलम १७४ तरतुदीनुसार त्यांना शिक्षा व्हावी, असा अर्ज दाखल केला आहे. यापुढील सुनावणी १० जानेवारी रोजी होणार आहे. राहुल गांधी यांना दोन वेळा समन्स बजावले होते. पुढील तारखेला न्यायालयात उपस्थितीत राहिले नाही तर न्यायालय कठोर कारवाई करेल. राहुल गांधी पुन्हा अनुपस्थित राहिले, तर मात्र त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले जाऊ शकते, अशी माहिती आमच्या वकिलांनी आम्हाला दिली, असे सात्यकी सावरकर यांनी सांगितले.