काका-पुतण्याची भेट; चर्चांना उधाण; काँग्रेसला वाटते, ‘कुछ तो गडबड है’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 07:20 IST2024-12-14T07:20:30+5:302024-12-14T07:20:55+5:30

अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सहकुटुंब तसेच पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत भेट घेतली.

sharad pawar ajit pawar meeting; sparks debate; Congress feels, 'Something is wrong' | काका-पुतण्याची भेट; चर्चांना उधाण; काँग्रेसला वाटते, ‘कुछ तो गडबड है’

काका-पुतण्याची भेट; चर्चांना उधाण; काँग्रेसला वाटते, ‘कुछ तो गडबड है’

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसानिमित्त दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. या भेटीमुळे एकीकडे महायुतीत सकारात्मक वातावरण असताना महाविकास आघाडीत मात्र अस्वस्थता आहे. 

 अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सहकुटुंब तसेच पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत भेट घेतली. ही भेट कौटुंबिक असल्याचे सांगितले जात असले तरी पक्षफुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच सहकुटुंब तसेच आपल्या पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांसह पवारांना भेटल्याने भविष्यात शरद पवार गट भाजपबरोबर जाणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

दिल्लीतील या भेटीगाठीमागे काँग्रेसला काही तरी गडबड असल्याचे जाणवते आहे. दिल्लीत आता बैठकांचा जोर वाढला, ज्या बैठका होत आहेत त्यातून ‘कुछ तो गडबड है’ असे म्हणायला स्कोप आहे, असे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

काँग्रेस-उद्धवसेना यांच्यात नाराजी
nविधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील दुरावा वाढत आहे.
nअशातच नुकत्याच पार पडलेल्या विशेष अधिवेशनात काँग्रेस आणि उद्धवसेनेत नाराजी नाट्य पाहायला मिळाले होते.
nआता शरद पवार पुढे काय राजकीय भूमिका घेणार, याबाबत शंका-कुशंका व्यक्त केल्या जात असतानाच मविआतील अस्वस्थताही वाढत आहे.
nयाबाबत जोपर्यंत शरद पवार स्पष्टीकरण देत नाहीत तोपर्यंत ही अस्वस्थता कायम राहणार, असे एका नेत्याने सांगितले.

‘५ खासदार फोडून आणा, मग मंत्रिपद’
यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू असलेला पुरोगामी महाराष्ट्राचा विचार, धर्मांध शक्तींपासून दूर राहण्याचा विचार शरद पवार यांनी राज्यात रूजवण्याचा प्रयत्न केला आहे. घाबरून भाजपच्या गोटात गेलेले हवशे, नवशे, गवशे यांच्या नादाला लागून ते वेगळा विचार करणार नाहीत, असा विश्वास उद्धवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

केंद्रात ६ खासदारांमागे एक मंत्रिपद असा फॉर्म्युला ठरलेला आहे. शरद पवारांचे ५ खासदार फोडून घेऊन या, मग तुमचा ६ खासदारांचा कोटा पूर्ण होईल, आणि मग तुम्हाला मंत्रिपद दिले जाईल, असे अजित पवार गटाला सांगितल्याची माझी माहिती आहे, असे राऊत म्हणाले. आगामी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेतही राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. 

पवार वेगळा विचार करणार नाहीत : वडेट्टीवार      
भाजपला दुसऱ्याचे घर, पक्ष फोडण्यात आसुरी आनंद मिळतो, त्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. आसुरी आनंदापोटीच काही तरी गडबड करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो, अशी शंका व्यक्त करतानाच पुरोगामी विचारांच्या आधारे शरद पवारांनी आपले पूर्ण आयुष्य घालवले. आताच्या सर्व परिस्थितीत ते वेगळ्या दिशेने जाण्याचा अजिबात विचार करणार नाहीत, अशी मला खात्री आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. 

Web Title: sharad pawar ajit pawar meeting; sparks debate; Congress feels, 'Something is wrong'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.