मिटकरींमुळे अजित पवारांची कोंडी?; 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या निर्मात्याने दिलं खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 12:09 PM2024-03-28T12:09:42+5:302024-03-28T12:10:30+5:30
अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेला अजित पवारांनी आर्थिक मदत केल्याचा दावा मिटकरी यांच्याकडून करण्यात आला होता.
Amol Mitkari ( Marathi News ) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघांची सर्वाधिक चर्चा होत आहे त्यामध्ये शिरूर मतदारसंघाचाही समावेश आहे. कारण या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार आणि निवडणुकीतील उमेदवार असलेल्या अमोल कोल्हे यांना आपण पाडणारच, असा चंग बांधला आहे. त्यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेले विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी नुकतीच आपल्या एक्स हँडलच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. यामध्ये अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेला अजित पवारांनी आर्थिक मदत केल्याचा दावाही करण्यात आला होता. मात्र मिटकरी यांचा हा दावा या मालिकेच्या निर्मितीमध्ये सहभाग असलेल्या एका सदस्याने खोडून काढला असून स्वत: कोल्हे यांनीही आपल्या सोशल मीडिया हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे.
अमोल मिटकरी यांचा दावा घोडत डॉ. घनश्याम यांनी म्हटलं आहे की, "मी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या निर्मिती टीमचा सदस्य म्हणून तुम्हाला सांगतो की अजित पवार यांनी कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही आणि दादांनी जर आर्थिक मदत केलेली असेल तर २ दिवसात पुरावे द्या. तुम्ही तुमच्या नेत्याचे गुणगान नक्की गा, पण आमच्या कष्टांमध्ये फुकटचे वाटेकरी बनू नका. ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांची नावे आम्ही मालिकेच्या नामावलीमध्ये साभार समाविष्ट केली आहेत. काहीही संबंध नसताना तुम्ही अजित पवार यांचं नाव घेत आहात. असं करून तुम्ही या मालिकेला ज्यांनी मदत केली त्यांचा तुम्ही अपमान करताय," असा आरोप घनश्याम यांनी केला आहे. तसंच कृपया तुम्ही पुरावे द्या किंवा जाहीर माफी मागा, अशी मागणीही त्यांनी केली आहे
दरम्यान, अमोल कोल्हे यांनीही डॉ. घनश्याम यांची ही पोस्ट आपल्या एक्स हँडलवरून रिपोस्ट केली आहे.
@amolmitkari22 मी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या निर्मिती टिमचा सदस्य म्हणुन तुम्हाला सांगतो की @AjitPawarSpeaks यांनी कोणतीही आर्थिक मदत केलेली नाही. आणि दादांनी जर आर्थिक मदत केलेली असेल तर २ दिवसात पुरावे द्या . तुम्ही तुमच्या नेत्याचे गुणगान नक्की गा, पण आमच्या.., १/३ https://t.co/fvDwULGCYJ
— DrGhanashyam (@DrGhanashyamRao) March 28, 2024
अमोल मिटकरींनी नेमकं काय म्हटलं होतं?
अमोल कोल्हे यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं होतं की, "स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे शुटिंग सुरू असताना आर्थिक अडचण उभी राहिल्यावर ज्यावेळी स्वतःचं घर गहाण ठेवण्याची पाळी अमोल कोल्हे यांच्यावर आली, त्यावेळी शंभूराजांवर असलेल्या निष्ठेपोटी तुमची आर्थिक अडचण दादांनीच दूर केली, हे महाराष्ट्राला एकदा सांगायचं धाडस कराल का?" असा सवाल मिटकरी यांनी अमोल कोल्हेंना उद्देशून विचारला होता.