महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता व्हाया मध्यप्रदेश; शरद पवार नाही 'या' नेत्याची मोठी मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 03:22 PM2019-11-28T15:22:50+5:302019-11-28T15:24:39+5:30
शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू होती. आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बोलणी सुरू केली होती.
भोपाळ : पक्षांच्या विचारधारा परस्परविरोधी असतानाही महाराष्ट्रात काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेनेचे सरकार स्थापन होणार आहे. या दोन पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केल्याचे सर्वश्रूत आहे. पण यामध्ये आणखी एक नाव आले आहे. सत्तास्थापनेचे अडकलेले घोडे मध्यप्रदेशच्या मदतीने गंगेत न्हाल्याचे समजते.
शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू होती. आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बोलणी सुरू केली होती. काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते चर्चा करत होते. त्यातच दिल्लीला विचारून पुन्हा चर्चा होत होती. काँग्रेसचे सारे निर्णय दिल्लीतून होत असल्याने नेत्यांना अवलंबून रहावे लागत होते. यातच शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा वेगवेगळी, त्याचा देशाच्या राजकारणावर होणारा परिणाम आदी गोष्टी अडलेल्या होत्या.
यामुळे काँग्रेस हातमिळवणीसाठी फारशी उत्सुक नव्हती. स्वत: शरद पवार देखील सोनिया गांधींना भेटले होते. तेव्हाही चित्र स्पष्ट होत नव्हते. काँग्रेस पक्षाच्या बैठकीत शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता जवळपास संपली होती. महाराष्ट्रतील सारे नेते या बैठकीला होते. तर आमदारांना जयपूरला ठेवण्यात आले होते. अशातच 11 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यास सांगितले. तेव्हाच एका शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना फोन केला. दिल्ली बिहार आणि झारखंडच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस विचारधारेला धक्का पोहोचवण्यास इच्छुक नव्हती.
यामुळे काँग्रेसने पाठिंब्याचे पत्र दिले नव्हते. यानंतर कमलनाथ यांनी 18 ते 21 नोव्हेंबर या काळात सोनिया गांधी, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा केली. यानंतर खरेतर काँग्रेसने शिवसेनेला सत्तेच्या चाव्या देण्याचे मान्य केले. शिवसेनेला पाठिंबा दिल्यास काँग्रेसवरचा अल्पसंख्यांकांसाठीचा पक्ष असल्याचा डाग पुसता येईल, असे जेव्हा सोनिया गांधींना पटले तेव्हा होकार मिळाल्याचे कमलनाथांच्या एका जवळच्या नेत्याने सांगितले.
आज संविधान दिवस पर महाराष्ट्र मामले में आया सुप्रीम कोर्ट का फ़ैसला स्वागत योग्य है।
— Office Of Kamal Nath (@OfficeOfKNath) November 26, 2019
आख़िरकार न्याय की जीत हुई।
सत्य व लोकतंत्र की जीत सुनिश्चित हो चुकी है।लोकतंत्र का मखौल उड़ाने की कोशिश आख़िर नाकामयाब साबित हुई।
सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं।
सत्यमेव जयते।
2/2
काँग्रेसच्या होकाराची बातमी लीक झाली आणि राज्यात भूकंप झाला
मध्य प्रदेशच्या काँग्रेस नेत्याने सांगितले की, 22 नोव्हेंबरला सायंकाळी भाजपाला महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजले. यामुळे भाजपामध्ये खळबळ उडाली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांच्या साथीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आज उद्धव ठाकरे यांनी कमलनाथ यांना शपथविधीला उपस्थित राहण्याचे खास निमंत्रण पाठविले आहे.