महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेचं आघाडीसोबत जमलं; पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचं काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 05:16 PM2019-11-13T17:16:53+5:302019-11-13T17:21:23+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : सावरकरांच्या मुद्दावर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किंबहुना शिवसेना पुन्हा सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी लावून धरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबई - काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी, बिहारमध्ये नितीश कुमार-भाजप, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टी -भाजप अशा अनपेक्षित युत्या सत्तेसाठी अस्तित्वात आल्या आहेत. आता महाराष्ट्रातही हिंदुत्ववादी शिवसेना आणि धर्मनिरपेक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाशिवआघाडी अस्तित्वात येत आहे. मात्र या महाशिवआघाडीत अनेक मुद्दयांवर वाद होण्याची शक्यता आहे.
शिवसेना आपल्या कणखर भूमिकेसाठी प्रसिद्ध असून सत्तेत असताना भाजपवर टीका करण्यात शिवसेनेने कधीच माघार घेतलेली नाही. शेतकरी कर्जमाफी असो वा पीकविमा या मुद्दावर शिवसेनेने भाजपला धारेवर धरले होते. परंतु, आता हीच शिवसेना कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत सहभागी होणार आहे. अर्थात विचारधारा वेगळी असल्यामुळे शिवमहाआघाडीत वाद होण्याचा संभव आहे.
यापैकीच एक म्हणजे स्वतंत्रवीर वि.दा. सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी होय. गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेकडून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे. तर काँग्रेसमध्ये सावरकरविरोधी सूर आहे. खुद्द राहुल गांधी यांनी सावकर यांच्या स्वातंत्र चळवळीतील भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. तर राष्ट्रवादीची भूमिका देखील काँग्रेसला पूरकच आहे. अशा स्थितीत सावरकरांच्या मुद्दावर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किंबहुना शिवसेना पुन्हा सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी लावून धरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.