जे बोलतो ते सत्य, काही दिवसांत काँग्रेस फुटणार; शिवसेना आमदाराचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 01:24 PM2023-07-06T13:24:19+5:302023-07-06T13:24:59+5:30

तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील आणि कुणी किती जागा लढवायच्या यावर चर्चा होईल असं शिरसाट यांनी सांगितले.

Shiv Sena MLA Sanjay Shirsat claims that Congress will split in the future | जे बोलतो ते सत्य, काही दिवसांत काँग्रेस फुटणार; शिवसेना आमदाराचा मोठा दावा

जे बोलतो ते सत्य, काही दिवसांत काँग्रेस फुटणार; शिवसेना आमदाराचा मोठा दावा

googlenewsNext

मुंबई – राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडत असताना आता भविष्यात काँग्रेसही फुटणार असा दावा शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा भूकंप होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह दिग्गज ८ नेते मंत्रिमंडळात समाविष्ट झाले. त्यामुळे शिवसेनेतील आमदार नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र आमच्यात कुठलीही नाराजी नाही असंही स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिले आहे.

आमदार संजय शिरसाट म्हणाले की, काँग्रेस फुटणार हे नक्की, विस्तार लवकरच होतील. त्यात शिवसेना-भाजपाच्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जातील. काँग्रेस कधी फुटेल याची वाट पाहावी लागेल. आम्ही संजय राऊत नाही. संजय शिरसाट आहे जे बोलेल ते सत्य आहे. काही काळानंतर काँग्रेसचा मोठा गट आमच्यासोबत दिसेल असं त्यांनी सांगितले.

ती टेबल न्यूज, आमदारांमध्ये समज नाही का?

शिवसेनेच्या बैठकीत आमदार भिडले अशी बातमी राजकीय वर्तुळात चर्चेत येत आहे. त्यावर शिरसाट यांनी म्हटलं की, शिवसेनेच्या बैठकीत काही घडलं नाही. बैठकीत राजकीय परिस्थितीबाबत महिती देण्यात आली. येणाऱ्या निवडणुकीत काय रणनीती असावी यावर चर्चा झाली. आमदारांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. आमदारांमध्ये वाद अत्यंत चुकीची आणि खोटारडी बातमी आहे. जे घडले ते सांगणारे आम्ही आहोत. जे घडलेच नाही ते सांगितले जाते. बोकांडी बसून मंत्रिपदे घेणारी माणसे नाही. ही टेबल न्यूज आहे. आमदारांमध्ये एवढी समज नाही का? अशी कुठलीही घटना घडली नाही असा खुलासा त्यांनी केला.

जागावाटपाबाबत चर्चा होईल  

अजित पवार यांनी ९० जागा लढवणार असल्याचे सांगितले त्यावर आम्ही २८८ जागा लढवणार आहोत. राजकारणात काय मागायचे किती लढवायचे हे शेवटच्या टप्प्यात ठरते. ही सगळी गणिते निवडणुकीच्या काळात होतात. दीड वर्षाचा कालावधी आहे. कार्यकर्त्यांसमोर टाकलेला प्रस्ताव असतो तो मान्य झालाय का? तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील आणि कुणी किती जागा लढवायच्या यावर चर्चा होईल असं शिरसाट यांनी सांगितले.

शिंदे कुटुंबप्रमुख, ते काळजी घेतील

कुणी बांशिंग बांधून बसलंय हे बोलण्यापेक्षा संजय राऊतांनी स्वत:चे घर बघावं. पेपर चालत नाही, कुणी वाचत नाही म्हणून ज्योतिषीचा धंदा नवीन सुरू केलाय. मी जिवंत आहे हे दाखवण्याचा केविळवाणा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. २०२४ पर्यंत शिंदेंच मुख्यमंत्री राहतील. भाजपानेही हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कुठलीही अडचण नाही. आमचे कुटुंबप्रमुख एकनाथ शिंदे आहेत. घरात भांडणे होणार नाही याची काळजी तेच घेतात असं शिरसाट म्हणाले.

ते खोटारडे आहेत, लोकांना कळाले

कुठल्याही एका आमदाराचे नाव सांगावे, कुणीही ठाकरे गटाच्या संपर्कात नाहीत. विनायक राऊत-संजय राऊत फेकाफेकी करत असतात. तुमच्याकडे कुणी येणार नाही. जे आहेत ते सांभाळा, जे असतील ते इकडे कधी येतील सांगता येणार नाही. थोडे दिवस थांबा. आम्ही केलेला उठाव आणि अजित पवारांनी केलेला उठाव यात साम्य आहे. कार्यकर्त्यांना मोठे होऊ द्यायचे नाही ही नेत्यांची मानसिकता असते त्याला दिलेला तो छेद आहे. अजित पवारांसोबत आलेले कमकुवत नेते नाहीत. प्रफुल पटेल सारखा नेता केंद्रीय पातळीवर मंत्रिपद सांभाळलेले आहेत. भुजबळ, वळसे पाटील मोठे नेते आहेत. यांनीही खोके घेतलेत का? करमणुकीसाठी हे आरोप लावले जातात. ज्यांना पक्ष सांभाळता आला नाही ते अशाप्रकारे घोषणा करतात. त्यामुळे हे खोटारडे आहेत लोकांना कळाले असा घणाघात शिरसाट यांनी विनायक राऊत आणि संजय राऊतांवर केला.

Web Title: Shiv Sena MLA Sanjay Shirsat claims that Congress will split in the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.