सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा मुद्दा सोडण्यास शिवसेना तयार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 12:27 PM2019-11-16T12:27:38+5:302019-11-16T12:38:38+5:30
महाशिवआघाडीत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेनेला देखील काही मुद्दांवर माघार घ्यावी लागणार असं चित्र आहे. आता या मसुद्यातील कोणकोणत्या मुद्दावर शिवसेना नरमाईची भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मुंबई - राज्यात महाशिवआघाडी स्थापन होण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. सरकार स्थापन करण्यापूर्वीच 'कॉमन मिनिमन कार्यक्रम' आखण्यात आला असून त्याचा मसुदा तयार करण्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते काम करत आहे. याच मसुद्यातील एक बाब समोर आली असून शिवसेना आपली वि.दा. सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी गुंडाळण्याची शक्यता आहे. या संदर्भात जनसत्ता वेबसाईटवर वृत्त आहे.
सावरकर यांच्याविषयी शिवसेना आणि काँग्रेस पक्षांत परस्पर विरोधी मत आहे. काँग्रेसनेतेराहुल गांधी यांनी सावकर यांच्या स्वातंत्र लढ्यातील भूमिकेवर अनेकदा शंका उपस्थित केलेली आहे. तर शिवसेनेकडून या मुद्दावर राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली असून सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी वारंवार करण्यात आलेली आहे.
दरम्यान शिवसेना आता काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन कऱण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सावकरांच्या मुद्दावर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या संदर्भातील मसुदा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते तयार करत आहेत. या मसुदा समितीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे असून मसुद्यात सावरकर यांना भारतरत्न मागणीचा मुद्दा सोडण्याची शिवसेनेने तयारी दाखवावी असा मुद्दा आहे. हा मसुदा तिन्ही पक्षांच्या हायकमांडकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
महाशिवआघाडीत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेनेला देखील काही मुद्दांवर माघार घ्यावी लागणार असं चित्र आहे. आता या मसुद्यातील कोणकोणत्या मुद्दावर शिवसेना नरमाईची भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.