“राहुल गांधींची ही देशभक्तीच, लडाख दौरा वीर जवानाप्रमाणे साहस”; ठाकरे गटाकडून तोंडभरून कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 08:18 AM2023-08-23T08:18:32+5:302023-08-23T08:20:06+5:30

Rahul Gandhi Ladakh Tour: राहुल गांधींनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत सत्य मांडले. भाजपस ते मान्य नसेल तर नेमके खरे काय ते पुराव्यासह मांडावे, असे आव्हान ठाकरे गटाने दिले आहे.

shiv sena thackeray group praised rahul gandhi about ladakh tour | “राहुल गांधींची ही देशभक्तीच, लडाख दौरा वीर जवानाप्रमाणे साहस”; ठाकरे गटाकडून तोंडभरून कौतुक 

“राहुल गांधींची ही देशभक्तीच, लडाख दौरा वीर जवानाप्रमाणे साहस”; ठाकरे गटाकडून तोंडभरून कौतुक 

googlenewsNext

Rahul Gandhi Ladakh Tour:राहुल गांधी सध्या लेह आणि लडाखच्या दौऱ्यावर आहेत व तेथील जनतेने राहुल गांधी यांच्या दौऱ्यास उदंड प्रतिसाद दिला आहे. राहुल गांधी स्वतः मोटरसायकल चालवीत लेहवरून लडाखला गेले. हा रस्ता दुर्गम व धोक्याचा आहे. राहुल गांधींचे हे साहस एखाद्या वीर जवानाप्रमाणे आहे. तेथून ते पेन्गाँगला पोहोचले व नुबरा, कारगील येथेही गेले. हे सर्व करण्यामागे राहुल गांधी यांची देशभक्तीच आहे, या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राहुल गांधी यांचे तोंडभरून कौतुक करण्यात आले आहे. 

लडाखच्या सीमेवरून चीन सतत धडका मारीत आहे.  गेल्या पाच-सहा वर्षांत चीनने आपल्या हद्दीत घुसखोरी करून जमीन बळकावली आहे. अनेक ठिकाणी चिनी व हिंदुस्थानी सैनिकांत संघर्ष झाला, पण पंतप्रधान मोदी हे सत्य स्वीकारायला तयार नाहीत. लडाखची इंचभरही जमीन गमावलेली नाही असा दावा पंतप्रधान मोदी करतात, पण मोदी सपशेल खोटे बोलत आहेत व चीनने आपल्या भूभागावर अतिक्रमण केले असल्याचे सत्य राहुल गांधी यांनी मांडले आहे. चीनने हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी केलीच आहे. गायरान जमिनी चीनने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे इंचभरही जमीन गमावली नाही हा पंतप्रधान मोदींचा दावा खोटा असल्याचे राहुल गांधी यांनी लडाखच्या भूमीवरून स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षेबाबत सत्य मांडल्याने भारतीय जनता पक्षाने टीका सुरू केली व पुन्हा एकदा मोदी भक्त भूतकाळातले खड्डे नव्याने उकरू लागले. भाजपच्या मते राहुल गांधी हे देशाचा अपमान करीत आहेत. चीनने घुसखोरी केली काय? असा प्रश्न विचारल्याने देशाचा कोणता व कसा अपमान झाला? हे भाजप प्रवक्त्यांना सांगता येईल काय? असा सवाल ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून केला आहे. 

भाजपास ते मान्य नसेल तर नेमके सत्य काय ते पुराव्यासह मांडावे!

चीनचे लष्करी सामर्थ्य हिंदुस्थानच्या तुलनेत प्रचंड आहे. पंतप्रधान मोदी यांनी चिनी राष्ट्राध्यक्षांना अहमदाबादेत आणून कितीही ‘झोके’ दिले तरी ‘भाई भाई’ किंवा ‘मैत्री’ अशा भाकड कथांवर चीन विश्वास ठेवत नाही. चीनने लडाखमध्ये घुसखोरी केलीच आहे व अनेकदा चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेश दाखवून आपल्याला डिवचले जाते. मोदींसारखा ‘सुपरमॅन’ पंतप्रधान आपल्याला लाभला असताना चीनने हिंदुस्थानच्या बाबतीत अशी वाकडी पावले टाकावीत हे मोदी भक्तांना मान्य होणार नाही. लडाखच्या भूमीवर राहुल गांधी आहेत. त्यांनी चिनी घुसखोरीचे सत्य मांडले. भाजपास ते मान्य नसेल तर नेमके सत्य काय ते त्यांनी पुराव्यासह मांडावे, असे आव्हान ठाकरे गटाने दिले आहे. 

देशभक्तीचा मक्ता भाजपनेच घेतलेला नाही

देशभक्तीचा मक्ता भाजपनेच घेतलेला नाही. पंतप्रधान मोदींची ५६ इंचाची छाती असताना चीन आत घुसला व त्याने आपल्या अनेक चौक्या ताब्यात घेतल्या. पूर्व लडाख सीमेवर पेन्गाँग परिसरात चीन व हिंदुस्थानी लष्करात हिंसक संघर्ष झाला होता व त्यात आपल्या जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. हे का घडले, याचा हिशेब जनता मागत आहे. ‘हिंदी चिनी भाई भाई’ला भाजपचा विरोध तकलादू आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करणे हे लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचे कामच आहे. सरकारने आपल्या बऱ्यावाईट कृत्यांचा जाब लोकांपुढे दिलाच पाहिजे; परंतु जेव्हा सरकार तसे करण्यास नकार देते तेव्हा कोणीतरी ही जबाबदारी पार पाडावी लागते. मोदी काळात चीन लडाखमधून किती आत आपल्या हद्दीत घुसला व त्याने नक्की काय बळकावले, देशाचे संरक्षण खाते तेव्हा काय करीत होते, हे जाणून घेण्याचा अधिकार आपल्या सगळय़ांनादेखील आहे. राहुल गांधी यांनी लडाखच्या भूमीवर जाऊन तेच केले आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. 


 

Web Title: shiv sena thackeray group praised rahul gandhi about ladakh tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.