...म्हणून कलाकार उभे करतो, अजित दादांचा निशाणा; ...तर लपूनछपून भेटण्याचे कारण काय? कोल्हेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 12:34 PM2024-03-05T12:34:10+5:302024-03-05T12:34:39+5:30
"खासगीत झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा राजकारणातील अलिखित नियम मी नेहमीच पाळला आहे. परंतु, तुम्ही वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत आरोप करत असाल तर मी नम्रपणे काही प्रश्न विचारू इच्छितो."
मुंबई: आम्हाला उमेदवार भेटला नाही की आम्ही कलाकाराला उभे करतो, अमोल कोल्हे त्यापैकीच एक. राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमामालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चन हेही निवडून आले. मग त्यांनी राजीनामा दिला. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमचीही चूक आहेच. आपल्या विचारांचा खासदार निवडून दिला तर कामे व्हायला मदत होणार आहे. विरोधी पक्षाचा खासदार निवडला की नुसता तलवार काढतो आणि लढत बसतो. तेही नाट्यप्रयोगातून, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंवर टीकास्त्र सोडले. शिरूर मतदासंघात ते सोमवारी आयोजित सभेत बोलत होते.
मागच्या वेळी मीच अमोल कोल्हे यांच्यासाठी मत मागायला तुमच्याकडे आलो होतो. त्यांचे वक्तृत्व चांगले होते. दिसायला राजबिंडा आहे. त्यावेळी मी सांगितले म्हणून तुम्ही कोल्हेंना निवडून दिले. पण तो बाबा काही दिवसांनी राजीनामा द्यायचा म्हणत होता. मुळात कोल्हे यांचा राजकारण हा पिंडच नाही, असे अजित पवार म्हणाले.
१० वेळा निरोप, लपूनछपून भेटण्याचे कारण काय? -
खासगीत झालेल्या गोष्टी जाहीर न करण्याचा राजकारणातील अलिखित नियम मी नेहमीच पाळला आहे. परंतु, तुम्ही वारंवार या गोष्टींचा उल्लेख करत आरोप करत असाल तर मी नम्रपणे काही प्रश्न विचारू इच्छितो. माझ्यासारखा सेलिब्रिटी उमेदवार देणे चूक असेल तर १०-१० वेळा आपण माझ्यासारख्या सर्वसामान्याला तुमच्या पक्षात येण्याचा निरोप पाठवण्याचे कारण काय? लपूनछपून भेटण्याचे कारण काय? अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. माझ्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडताना मला तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याचेही ते म्हणाले.
अजित पवार सातत्याने दावा करत आहेत की, मी त्यांना राजीनामा देण्याबद्दल बोललो होतो. परंतु, या काळात मी संसदेत कधी अनुपस्थित होतो का? तुमच्या पक्षाचे सुनील तटकरे यांच्या संसदीय कामगिरीपेक्षा तुम्ही ज्याला सेलिब्रिटी म्हणून हिणवता त्या अमोल कोल्हेची कामगिरी कायमच उजवी राहिली आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.