"राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 02:01 PM2021-09-02T14:01:14+5:302021-09-02T14:04:16+5:30
निर्णय घेण्यात आल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. शाळा सुरू करण्याअगोदर ही प्रक्रिया होणार पूर्ण.
राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत, अशा सूचना देण्यात आल्या असून तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी गुरूवारी माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल असेही अजित पवार म्हणाले.
"राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत," असेही ते म्हणाले. मात्र केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पद्धतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसर्या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण करावेत, अजित पवारांचे आवाहनhttps://t.co/CbvSFUjpi9#Coronavirus #ajitpawarpic.twitter.com/WtZWGpF74a
— Lokmat (@MiLOKMAT) September 2, 2021
मराठवाड्यातील अतिवृष्टीवरही भाष्य
मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शिवाय त्या - त्या जिल्हयाचे पालकमंत्री घटनास्थळी पोचले असल्याची माहिती अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
मराठवाडयात झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे शिवाय जमीनी खरवडून निघाल्या आहेत तर काही भागात घाट कोसळून वाहतूक ठप्पही झाली होती. याबाबत कालच मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत. त्या - त्या जिल्हयाचे जिल्हाधिकारी या सगळ्या नुकसानीची पाहणी करत आहेत असेही अजित पवार यांनी सांगितले.