लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 05:21 AM2024-11-19T05:21:47+5:302024-11-19T05:22:53+5:30
मुंबई व महाराष्ट्राची संपत्ती लुटणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवा; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची लढाई एक-दोन उद्योगपती आणि राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला व तरुण यांच्यातील आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा मुंबई व महाराष्ट्राच्या संपत्तीवर डोळा असून, ती लुटण्याचे काम सुरू आहे. धारावी प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईतील एक लाख कोटी रुपये किमतीची जमीन एका व्यक्तीला दिली जात आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधत मविआ सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील जनतेसाठी काय करणार, याची माहिती दिली.
मुंबईतील धारावी ही लघू व मध्यम उद्योगाचे हब आहे. हे हब बंद करून धारावी अदानींच्या घशात घालण्यास सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. हा फक्त धारावी पुरता मुद्दा नसून मुंबई, मुंबईचे पर्यावरण यांच्याशीही संबंधित आहे. देशातील विमानतळे, संरक्षण साहित्य बनविण्याचे काम, बंदरे, ऊर्जा निर्मिती प्रकल्प सर्वकाही एकाच व्यक्तीच्या हातात देण्यासाठी भाजप सरकार काम करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे, सोयाबीन, कापूसाला भाव नाही, तर बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. भाजप सरकारने नोकरभरती न करता महाराष्ट्रात येणारे वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअर बस, बल्क ड्रग प्रकल्प, आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र सारखे तब्बल ७ लाख कोटींच्या गुंतवणुकीचे प्रकल्प राज्याबाहेर घालविले. ५ लाख युवकांचे रोजगारही बाहेर गेले, अशी टीकाही त्यांनी केली.
- मविआची सत्ता आल्यानंतर महिलांना महिना ३ हजार, एसटीचा मोफत प्रवास, शेतकऱ्यांचे ३ लाखांपर्यंतचे कर्ज माफ, सोयाबीनला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव, कापसाला योग्य भाव, राजस्थानच्या धर्तीवर २५ लाखांचा आरोग्य विमा देणार.
- बेरोजगारांना महिना ४ हजारांचा भत्ता, अडीच लाख रिक्त सरकारी पदांची भरती, जातनिहाय जनगणना, ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा हटविणे यावरही भर दिला जाईल, असेही राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेसच्या गॅरंटी व मविआच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता करण्यात कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते