छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 12:43 PM2024-10-05T12:43:28+5:302024-10-05T12:44:14+5:30

जेव्हा शिवरायांचा राज्याभिषेक होणार होता तेव्हा याच विचारधारेने राज्याभिषेक होऊ दिला नाही. ही नवीन गोष्ट नाही. हजारो वर्ष जुनी ही लढाई आहे. ज्या विचारधारेविरोधात शिवाजी महाराज लढले होते त्याच विचारधारेविरोधात काँग्रेस आज लढत आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं.  

The ideology of Chhatrapati Shivaji Maharaj is the India Constitution; Rahul Gandhi attack on BJP | छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात

छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात

कोल्हापूर -  देश सर्वांचा आहे. सर्वांना सोबत घेऊन जायचंय, अन्याय करायचा नाही हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांची देश आणि जगाला दिला. शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं आज कोणतं प्रतिक असेल तर ते संविधान आहे. जे शिवाजी महाराजांनी सांगितले, २१ व्या शतकात त्याचे रुपांतर काय असेल तर ते संविधान आहे. यात आपल्याला एकही अशी गोष्ट सापडणार नाही ज्यासाठी शिवाजी महाराज लढले नाहीत. संपूर्ण आयुष्य ते लढले, जे कार्य केले, त्यांच्या विचारधारेनेच संविधान आले असं सांगत काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपावर घणाघात केला. 

कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाषणात राहुल गांधी म्हणाले की, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करतोय, पुतळा असाच उभारला जात नाही तर आपण एखादा व्यक्ती, त्यांची विचारधारा आणि त्यांच्या कार्याला मनापासून मानतो तेव्हा उभारला जातो. आम्ही पुतळ्याचं अनावरण केले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण आयुष्यभर ज्यासाठी लढले, त्यासाठी आम्ही लढलो नाही तर पुतळ्याला काही अर्थ नाही. जेव्हा आपण छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करतो तेव्हा एक वचनही घेतो, ज्याच्यासाठी ते लढले, त्यांच्या इतके नाही परंतु थोडं आपल्यालाही करायला हवं. जर शिवाजी महाराजांसारखे, शाहू महाराजांसारखे व्यक्ती नसते तर आज संविधान नसते. याचा अर्थ शिवाजी महाराजांची विचारधारा आणि संविधान यांचे थेट कनेक्शन आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच हिंदुस्थानात आज २ विचारधारांची लढाई आहे. एक विचारधारा संविधानाचं रक्षण करते, समानता आणि एकतेची गोष्ट करते. ती शिवाजी महाराजांची विचारधारा आहे. दुसरी विचारधारा जे संविधान संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करतेय. ते सकाळी उठतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं जे संविधान आहे ते संपवायचं कसं हा विचार करतात. हिंदुस्थानातील संस्थांमध्ये आक्रमण करतात. लोकांना धमकावतात, घाबरवतात आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माथा टेकतात याला काही अर्थ नाही. जर तुम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेता, त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होता तर तुम्हाला संविधानाचं रक्षण करावं लागेल. विचारधारा खूप जुनी आहे. शिवाजी महाराजांच्या काळातही ही लढाई सुरू होती. जेव्हा शिवरायांचा राज्याभिषेक होणार होता तेव्हा याच विचारधारेने राज्याभिषेक होऊ दिला नाही. ही नवीन गोष्ट नाही. हजारो वर्ष जुनी ही लढाई आहे. ज्या विचारधारेविरोधात शिवाजी महाराज लढले होते त्याच विचारधारेविरोधात काँग्रेस आज लढत आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं. 

दरम्यान, नियत कधी लपवू शकत नाही, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला पण काही महिन्यांनी तो कोसळला. त्यांची नियत चुकीची होती. पुतळ्याने ते संकेत दिले. जर तुम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असाल तर तुम्हाला त्यांच्या विचारधारेचं रक्षण करावे लागेल. त्यामुळे तो पुतळा पडला. कारण त्या लोकांची विचारधारा चुकीची आहे. ते शिवाजी महाराजांसमोर हात जोडतात आणि २४ तास शिवाजी महाराजांच्या विचारांविरोधात काम करतात. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ दिला नाही. राम मंदिराच्या उद्घाटनात, संसदेच्या उद्घाटनात आदिवासी राष्ट्रपतींना जावू दिले नाही.या विचारधारा एकच आहे, विचारधारेत फरक नाही. ही राजकीय लढाई नसून विचारधारेची लढाई आहे. संविधानाची आणि घटनेची लढाई आहे. संविधानात शिवाजी महाराजांचा आवाज, त्यांचे विचार आहेत. त्यामुळे जर तुमच्यासमोर कुणी आले आणि मी शिवाजी महाराजांना मानतो असं सांगितले तर तुम्ही एक सवाल करा. तुम्ही मूर्तीसमोर हात जोडता पण तुम्ही देशाच्या संविधानाला मानता का?, तुम्ही देशातील संस्थांना वाचवता का? तुम्ही देशात गरिबांचं संरक्षण करता का? जर करत नसाल तर मूर्तीसमोर हात जोडण्याला काही अर्थ नाही अशी टीकाही राहुल गांधी यांनी भाजपावर केली. 

महाराष्ट्राच्या मातीत ही विचारधारा

मनात विचारधारा असावी लागते, बाहेर कुणीही काही दाखवू दे, शिवाजी महाराजांची विचारधारा संविधानात आहे पण शिवाजी महाराजांना ही विचारधारा महाराष्ट्राच्या मातीनं दिली. महाराष्ट्रातील लोकांनी दिली. हे तुमच्या रक्तात आहे. मी जेव्हाही महाराष्ट्रात येतो, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या आयुष्यात दरदिवशी छत्रपती शिवाजी महाराज दिसतात. त्यांची विचारधारा दिसते. त्यासाठी तुम्ही लढता. काँग्रेस कार्यकर्त्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेचं रक्षण करणे आहे, जेव्हा तुम्ही त्या विचारधारेचं रक्षण करता तेव्हा तुम्ही संविधानाचा आदर आणि संरक्षण करता असंही राहुल गांधींनी सांगितले.  
 

Read in English

Web Title: The ideology of Chhatrapati Shivaji Maharaj is the India Constitution; Rahul Gandhi attack on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.