राहुल गांधींनी दाखवलेले पत्र खरे, पण...; सावरकरांच्या नातवाने रोखठोक सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 04:37 PM2022-11-19T16:37:37+5:302022-11-19T16:38:03+5:30
ज्यांची सत्ता गेलेली आहे तो माणूस कुठल्याही थराला जावून अशी विधानं करू शकतो असं सावरकरांच्या नातवानं म्हटलं.
पुणे - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील विधानामुळे राज्यात सध्या राहुल गांधींविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राहुल गांधींच्या विधानावरून हा वाद निर्माण झाला आहे. राजकीय स्वार्थापोटी राहुल गांधींनी हे विधान केले असून ते बेजबाबदार आहेत. सावरकरांची बदनामी केल्यावर हिंदुत्ववादी गटाला बॅकफूटवर जावं लागेल असं त्यांना वाटलं असाव. परंतु या विधानामुळे हिंदुत्ववादी, सावरकर प्रेमी सगळ्या संघटना पेटून उठल्या आहेत. यातून सावरकर अभ्यासक तयार होणार असून या वादातून त्यांना स्फूर्ती मिळेल आणि आणखी अभ्यास करून सावरकर जगासमोर मांडतील याचा आनंद असल्याचं सावरकराचे नातू सात्यकी सावरकर यांनी म्हटलं आहे.
सात्यकी सावरकर म्हणाले की, राहुल गांधींनी दाखवलेली पत्रे ही खरी आहेत परंतु त्याला माफीनामा म्हणणं अयोग्य आहे. ती निवेदनं आहेत. सावरकर जेव्हा अंदमानात गेले तेव्हा त्यांना एका कोठडीत ठेवले होते. कुठल्याही सुविधा नव्हत्या. सामान्य बंदीवानाच्या सुविधा मला मिळाव्यात यासाठी त्यांनी अर्ज केले होते. माझ्यासोबत जितके क्रांतीकारी आहेत त्यांची सुटका करा असंही पत्रे लिहिले होते. सावरकरांना १९२९ साली महिना ६० रुपये निर्वाह भत्ता सुरू झाला. ती पेन्शन नव्हती. असे निर्वाह भत्ते काँग्रेस नेत्यांनाही मिळत होते. नुकतेच गांधीजींचेही समोर आले आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्यांची सत्ता गेलेली आहे तो माणूस कुठल्याही थराला जावून अशी विधानं करू शकतो. गांधींचे वारसदार सतत गरळ ओकत आहे. सावरकरांच्या विचारधारेला विरोध करा पण बदनामी करू नका. राहुल गांधी, तुषार गांधी सातत्याने सावरकरांची बदनामी करतात. आम्ही कधीही गांधींजींची बदनामी केली नाही. राहुल गांधींचे विधान कुणालाही चीड आणणारी आहे. सावरकरांचे वैचारिक विरोधक तेदेखील या विधानाला पाठिंबा दिला नाही. विरोधक असो वा समर्थक कुणीही राहुल गांधींच्या विधानाला पाठिंबा देणार नाही असंही सात्यकी सावरकर यांनी म्हटलं.
दरम्यान, राजकीय लाभापोटी शिवसेना ठाकरे गट काँग्रेससोबत आहे. सावरकरांना भारतरत्न मिळावा अशी कुठलीही मागणी कुटुंबियांनी केलेली नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यातच मला माझी संपत्ती मिळाली असं सावरकर म्हणाले होते. सावरकरांना विरोध असेल तर करा परंतु बदनामी करू नका अशी मागणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"