दिल्लीचा रस्ता यावेळी महाराष्ट्रातून? सत्ताधाऱ्यांसह विराेधकांचेही राज्यावर विशेष लक्ष केंद्रित
By यदू जोशी | Published: January 1, 2024 07:39 AM2024-01-01T07:39:29+5:302024-01-01T07:42:21+5:30
महाराष्ट्रासह पाच प्रमुख राज्यांवर भाजपची मदार आहे आणि त्याचवेळी महाराष्ट्राने साथ दिली तर भाजपला पर्याय उभा करता येईल, असे इंडिया आघाडीचे गणित आहे. महाराष्ट्रकेंद्रित राजकारणाला त्यामुळे यावेळी अधिक भाव असेल.
यदु जोशी -
मुंबई : लोकसभेत ४८ खासदार पाठविणाऱ्या महाराष्ट्राला देशाचे २०२४ चे सत्ताकारण ठरविताना कधी नव्हे एवढे महत्त्व येऊ शकते. महाराष्ट्रासह पाच प्रमुख राज्यांवर भाजपची मदार आहे आणि त्याचवेळी महाराष्ट्राने साथ दिली तर भाजपला पर्याय उभा करता येईल, असे इंडिया आघाडीचे गणित आहे. महाराष्ट्रकेंद्रित राजकारणाला त्यामुळे यावेळी अधिक भाव असेल.
उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार या हिंदी भाषिक राज्यांबरोबरच भाजपची मदार असेल ती महाराष्ट्रावर. त्याच वेळी हिंदी पट्ट्यात अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेली काँग्रेस ही मुख्यत्वे दक्षिणेकडील स्वत:ची ताकद, देशभरातील मित्रपक्षांची साथ आणि महाराष्ट्रावर विसंबून असेल. भाजपच्या बाजूने झुकलेला सत्तेचा लोलक स्वत:कडे वळविण्यासाठी महाराष्ट्र हा मुख्य बिंदू असल्याची जाणीव इंडिया आघाडीला नक्कीच असणार. त्यादृष्टीने काँग्रेस रणनीती आखत आहे. देशातील काही प्रमुख राज्यांचा लोकसभेच्या दृष्टीने मूड ठरल्याचे चित्र दिसत असताना अजूनही तसा मूड न ठरलेले राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितले जात आहे. म्हणूनच दोन्ही प्रमुख बाजू अधिक सतर्क होत महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित करीत आहेत.
प्रचंड राजकीय घडामोडींनंतर एकत्र आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तीन नेत्यांच्या तीन पक्षांच्या महायुतीला आव्हान देण्यासाठी विरुद्ध बाजूने सज्ज असलेले राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नाना पटोेले असा सामना बघायला मिळेल. राज्याच्या राजकारणावर नेमकी पकड कोणकोणत्या नेत्यांची याचा कौलही मिळेल. राज्यात सत्तांतराचे जे आडवेतिडवे प्रयोग गेल्या सव्वाचार वर्षांत राज्यात झाले त्यापैकी कोणत्या प्रयोगाला मतदारांची पसंती होती, याचा निर्णयही होईल. सत्तांतराच्या अद्भुत प्रयोगांनंतर कोणतीही मोठी निवडणूक महाराष्ट्रात झालेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त २०२४ मध्येही लागेल, असे दिसत नाही. अशावेळी लोकसभा निवडणूक ही प्रत्येक पक्षासाठी त्यानंतर सहा महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट असेल.
एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अधिक जागा मिळतात की महाविकास आघाडीला आणि केंद्रात सरकार कोणाचे येते, यावर नोव्हेंबरच्या आसपास होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे निकाल अवलंबून असतील. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला महाराष्ट्रात दुहेरी महत्त्व आहे. भाजपला महाराष्ट्रात मोठे यश मिळवून देण्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे योगदान किती असेल, यावरही पुढची काही गणिते असतील. महायुती आणि महाविकास आघाडीकडूनही आपापल्या ज्येष्ठ आमदारांना लोकसभेच्या आखाड्यात उतरविले जाऊ शकते. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील काही नेते दिल्लीत जातील व इथे त्यामुळे रिकाम्या झालेल्या जागांवर नवे चेहरे दिसतील अशी जोरदार चर्चा आहे. त्याचे काय होते तेही दिसेल.
यांच्याकडेही लक्ष
वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, एमआयएम, आम आदमी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, शिवसंग्राम, बहुजन विकास आघाडी, जनसुराज्य शक्ती, रिपाइं, प्रहार जनशक्ती पार्टी आदी पक्ष मतविभाजन करतात की, मोठ्या पक्षांना बळ देतात, याकडेही लोकसभा निवडणुकीत लक्ष असेल.
बरेच पाणी वाहून गेले
- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने ४१, राष्ट्रवादीने पाच, काँग्रेस आणि ‘एमआयएम’ने एकेक जागा जिंकली होती. त्यानंतर बरेच पाणी वाहून गेले.
- शिवसेना आणि राष्ट्रवादी हे राज्याच्या राजकारणातील दोन मोठे प्रादेशिक पक्ष फुटले. त्यातील कोणत्या गटांना मतदारराजाची पसंती आहे, याचा फैसला लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे.