Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचे पाप ठरवून केले गेले, आता आम्ही...; नाना पटोले आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 03:28 PM2023-03-24T15:28:31+5:302023-03-24T15:29:59+5:30
"राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचे पाप ठरवून केले गेले आहे. लोकशाही विरोधी व्यवस्था निर्माण करण्याचे काम भारतीय जनता पार्टी ठरवून करत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान व्यवस्थेला संपवण्याचे काम करत आहे. यामुळे त्याचा निषेध आम्ही आज विधानसभेत केला."
मोदी आडनाव प्रकरणावर गुरुवारी सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांना लगेचच जामीनही मिळाला. या संपूर्ण घटनेनंतर आज लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व अर्थात खासदारकी रद्द केली. विशेष म्हणजे न्यायालयाच्या निर्णयानंतर चोवीस तासांच्या आत ही कारवाई करण्यात आली आहे. राहुल यांच्यावरील या कारवाईनंतर महाराष्ट्र काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे.
यासंदर्भात बोलताना, राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचे पाप ठरवून केले गेले आहे. लोकशाही विरोधी व्यवस्था निर्माण करण्याचे काम भारतीय जनता पार्टी ठरवून करत आहे. आता आम्ही रस्त्यावरची लढाई उभी करू, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ते माध्यमांसोबत बोलत होते.
नाना म्हणाले, "ज्यापद्धतीने लोकसभा अध्यक्षांचा निर्णय पुढे आला आहे. तो निर्णय लोकशाही व्यवस्थेच्या विरोधातील आहे. गेल्या 9 वर्षांत नरेंद्र मोदींचे सरकार आपल्या मित्रांसाठी, ललीत मोदी असतील, निरव मोदी असेल, मेहुल चौकसी असेल, विजय मल्ल्या असेल, असे अनेक लोक, या देशातील लोकांचे हजारो लाखो कोटी रुपये घेऊन पळाले त्यांना सपोर्ट करण्याचे काम करत आहे. याविरोधात राहुल गांधी आवाज उचलत आहेत."
नाना पटोले म्हमाले, "राहुल गांधींना लोकसभेत बोलू दिले जात नाही. रस्त्यावर बोलायला गेल्यास तेथेही बंधने आणली जातात. या बंधनांच्या माध्यमातून खोटी तक्रार गुजरातमधील सुरतमध्ये टाकून, काल माननीय जिल्हा न्यायालयाचा निर्णय घेऊन, आज त्यामाध्यमातून राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचे पाप ठरवून केले गेले आहे. लोकशाही विरोधी व्यवस्था निर्माण करण्याचे काम भारतीय जनता पार्टी ठरवून करत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान व्यवस्थेला संपवण्याचे काम करत आहे. यामुळे त्याचा निषेध आम्ही आज विधानसभेत केला."
"आता आम्ही रस्त्यावरची लढाई उभी करू. ज्या पद्धतीने इंग्रज वागत होते, त्यांच्या अत्याचाराविरोधात जो कुणी बोलेल त्याला फाशीची शिक्षा दिली जात होती. त्याला गोळ्या घातल्या जात होत्या. तसेच या लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून कुणाला इडी लावायचे, कुणाला सीबीआय लावायचे आणि त्याला दबावात ठेवायचे. पण राहुल गांधींनी सांगितले की, तुम्ही कुठेही टाका, तुम्ही देशाची रिझर्व्ह बँक लुटली. देशाची तिजोरी लुटली, म्हणून मी तुमच्या विरोधात बोलेन, अशी भूमिका सातत्याने मांडणाऱ्या राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द केले. त्याचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पक्षाच्या कृतीचा आणि मोदी सरकारचा आम्ही धिक्कार करतो," असेही काँग्रेसनेते नाना पटोले यांनी म्हटले आहे.