"राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय आणि हुकुमशाही वृत्तीला चपराक" नाना पटोलेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 04:07 PM2023-08-04T16:07:17+5:302023-08-04T16:08:12+5:30
Rahul Gandhi News: राहुल गांधी यांना खोट्या तक्रारीच्या माध्यमातून शिक्षा देण्याचे काम झाले होते. पण देशात आजही न्यायव्यवस्था जिवंत आहे. राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय व हुकुमशाही वृत्तीला चपराक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीचे काँग्रेस पक्ष स्वागत करत असून हा सत्याचा विजय आहे. देशात हुकुमशाही व मनमानी कारभार सुरु असून, या शक्तींच्या विरोधात काँग्रेस न डगमगता उभी आहे. राहुल यांच्यावर खोट्या तक्रारीच्या माध्यमातून शिक्षा देण्याचे काम झाले होते. पण देशात आजही न्यायव्यवस्था जिवंत आहे. राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय व हुकुमशाही वृत्तीला चपराक असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकार सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे मागील ९ वर्षापासून देश पहात आहे. राहुल गांधी हे सातत्याने केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारत होते. राहुल यांच्यामुळे मोदी सरकारची कोंडी होत होती. संसदतेच राहुल गांधी यांनी मोदी-अदानीच्या भ्रष्ट युतीची चिरफाड केली होती. यातूनच राहुलजी यांच्याविरोधात भाजपाने षडयंत्र रचले व न्यायालयाच्या माध्यमातून त्यांची खासदारी रद्द करण्यात आली व शिक्षा सुनावताच अवघ्या २४ तासात त्यांना सरकारी निवासस्थानही सोडण्यास सांगितले होते. यामागे भाजपाचा हात आहे हे उघड दिसत होते. राहुल गांधींना खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी भाजपाने ओबीसी समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ओबीसी समाज कष्टकरी व स्वाभिमानी आहे. निरव मोदी, ललित मोदी जनतेचा पैसा लूटून परदेशात पळून गेले, त्यांच्यावर भाजपाने कारवाई केली नाही. उलट मोदी आडनावावरून ओबीसी समाजालाच चोर ठरवण्याचा भाजपाचा डाव होता. सुप्रीम कोर्टाच्या निकालाने मात्र भाजपाचा हा डाव हाणून पाडला गेला.
भाजपा खासदारांवर बलात्कार, खूनासारखे गंभीर गुन्हे असतानाही त्यांच्यावर कारावई केली जात नाही मात्र विरोधी पक्षांच्या नेत्यांवर तात्काळ कारवाई केली जाते. कर्नाटकातील एका प्रचार सभेतील विधानाचा आधार घेत गुजरातच्या सुरत न्यायालयात तक्रार दाखल केली जाते. व राहुल गांधी यांची खासदारी रद्द होती हा घटनाक्रम भाजपाचे राहुल गांधी यांच्याविरोधातील षडयंत्र उघड करण्यास पुरेशी आहे. मोदी सरकारला देशातभरात थेट भिडणारा नेता राहुल गांधीच आहेत म्हणून त्यांना राजकारणातून बाहेर काढण्यासाठी हे सर्व करण्यात आले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने या हुकूमशाहीवृत्तीला चपराक लगावली आहे. यापुढेही काँग्रेस पक्ष व राहुल गांधी देशातील हुकूमशाही वृत्तीविरोधात लढत राहील, असेही नाना पटोले म्हणाले.
राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याचा आनंद काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर व्यक्त केला. तसेच राज्यभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटत जल्लोष केला.