सावरकर ब्राह्मण होते म्हणून त्यांना विरोध- शरद पोंक्षे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 09:11 AM2019-12-23T09:11:06+5:302019-12-23T09:20:12+5:30
संघ, शिवसेना, हिंदुत्त्वावर शरद पोंक्षेचं भाष्य
कल्याण: काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला. त्यावर भाष्य करताना सावरकर ब्राह्मण होते म्हणून त्यांना विरोध झाला. त्यांचं आडनाव वेगळं असतं तर वाद झाला नसता, अशी प्रतिक्रिया अभिनेते शरद पोंक्षे यांनी दिली. सावरकर यांच्यावरुन होणाऱ्या वादामागे मतपेटीचं आणि जातीयवादाचं राजकारण दडलेलं असल्याचंदेखील ते म्हणाले. कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
सावरकर ब्राह्मण असल्यानं त्यांच्यावर टीका केली जाते. मात्र जातीयवाद संपवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न कोणालाच दिसत नाही, याबद्दल शरद पोंक्षे यांनी खंत व्यक्त केली. 'सावरकर ब्राह्मण आहेत म्हणून कोणीही येतं आणि त्यांना टपल्या मारुन जातं. त्यांच्या पाठीमागे कोणीच उभं राहत नाही. पण सावरकर वाचल्यानंतर हे लक्षात येतं की ज्या माणसानं जात हा शब्द संपुष्टात आणण्यासाठी आयुष्य झिजवलं, त्याच माणसाला ब्राह्मण या तीन अक्षरांमध्ये बंदिस्त करुन ठेवलं आहे', असं शरद पोंक्षे म्हणाले.
शरद पोंक्षेंनी राष्ट्रीय स्वयंसेक संघ आणि शिवसेनेवरदेखील भाष्य केलं. 'संघात अत्यंत चांगली माणसं घडवली जातात. मीदेखील तिथे होतो. मात्र काही कारणानं बाहेर पडलो. संघात दंड शिकवतात. पण मारायची वेळ आली की बौद्धिक घेतात. आम्हाला दंड मारायला खूप आवडतात. ते दंड मारायला आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं. म्हणून आम्ही शिवसेनेत गेलो,' असं पोंक्षे यांनी सांगितलं.
हिंदू असणं म्हणजेच सेक्युलर असल्याचं म्हणत शरद पोंक्षेंनी हिंदुत्वावर त्यांचं मत व्यक्त केलं. 'गर्व कहो से हम हिंदू है म्हटल्यानं इतर धर्मांचा अपमान होत नाही. पण मला माझ्या धर्माचा गर्व आहे. कारण हिंदू असणं म्हणजेच सेक्युलर असणं. हिंदू असणं म्हणजेच मनुष्य असणं. हिंदू असणं म्हणजेच मानवतावादी असणं. त्यामुळे आम्ही सेक्युलर आहोत हे वेगळं सांगण्याची गरज लागत नाही,' असं पोंक्षे म्हणाले.