...तोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यमुक्त करा, मीरा बोरवणकरांच्या आरोपांनंतर काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 06:32 PM2023-10-16T18:32:55+5:302023-10-16T18:33:33+5:30
Ajit Pawar News: मीरा बोरवणकर यांनी केलेल्या या गंभीर आरोपांची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी आणि चौकशी होईपर्यंत अजित पवार यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
मुंबई - माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. अजित पवार यांनी सरकारी जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता. असा गंभीर आरोप बोरवणकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला आहे. मीरा बोरवणकर यांनी केलेल्या या गंभीर आरोपांची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी आणि चौकशी होईपर्यंत अजित पवार यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मीरा बोरवणकर यांनी येरवड्याची पोलीस विभागाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा तत्कालीन पालकमंत्र्यांचा प्रयत्न होता हा जो आरोप केला आहे, त्यावर सरकारला आम्ही अधिवेशनात जाब विचारणाच आहेत. पण चौकशी करा अशी मागणी केली तर सरकारच सरकारची चौकशी कशी करणार? या प्रकरणात ‘दाल में कुछ काला है’, असे नाहीतर सर्व डाळच काळी आहे.
अजित पवार यांनी त्यांच्या जवळचा बिल्डर शाहीद बलवा याला सरकारी जमीन द्यावी म्हणून आपल्यावर कसा दबाव आणला हे बोरवणकर यांनी पुस्तकात लिहिले होतेच पण आज पत्रकार परिषद घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करत गंभीर आरोप केले आहेत. सरकारमध्ये जर काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फतच या प्रकरणी चौकशी केली पाहिजे तरच सर्व सत्य बाहेर येईल, असेही पटोले म्हणाले.