सावरकरांवरून उद्धव ठाकरेंची राहुल गांधींवर टीका, आता काँग्रेसने दिलं असं प्रत्त्युत्तर, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 04:40 PM2023-03-27T16:40:55+5:302023-03-27T16:41:42+5:30
Congress Vs Uddhav Thackeray: सावरकर माफी मागून परत आल्यानंतर त्यांनी देशात हिंदू मुस्लीम विवाद उभा केला. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला, देशाच्या फाळणीत त्यांचे योगदान मोठे आहे.
मुंबई - सावरकरांच्या मुद्द्यांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेस पक्षाचे विचार वेगवेगळे आहेत हे सर्वश्रुत आहे. काँग्रेस पक्षाने विचारांशी कधीच तडजोड केलेली नाही. काँग्रेस सर्वधर्म समभावाचा पुरस्कार करणारा पक्ष असून कुठल्याची धर्माचा वा व्यक्तीचा द्वेष करत नाही. सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन काँग्रेस जात असते. सावरकर मुदद्यांवर राहुल गांधी व उद्धव ठाकरे चर्चा करतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, देशात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा विचार करून एका मोठ्या लढाईसाठी काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस किमान समान कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत. सध्या देश, लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई महत्वाची आहे. ही लढाई मोठी असून भाजपाविरोधातील लढाईसाठी आम्ही एकत्र लढत आहोत. सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे, त्यात नवीन काहीच नाही. परंतु सावरकर मुदद्यावरून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचे षडयंत्र विरोधक करत आहेत परंतु त्यात त्यांना यश येणार नाही, आम्ही एकत्रच आहोत. देशातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर भाजपा व मोदी सरकारकडे उत्तर नाही म्हणूनच ते सावरकरांसारखे मुद्दे पुढे करून जबाबदारीपासून पळ काढत आहेत.
सावरकर माफी मागून परत आल्यानंतर त्यांनी देशात हिंदू मुस्लीम विवाद उभा केला. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला, देशाच्या फाळणीत त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी देशात विषाक्त वातावरण निर्माण केले त्यातूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली असे देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनीच म्हटलेले आहे, असेही पटोले म्हणाले.