West Bengal Election 2021: “इथे आहेत त्या सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्यात, नोकरी कुठून देणार हे?”
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 08:14 PM2021-03-25T20:14:04+5:302021-03-25T20:16:48+5:30
west bengal assembly election 2021: केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र जारी केले. त्यावर आता काँग्रेसकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
मुंबई : देशातील पाच राज्यांमध्ये होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणसंग्राम आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election 2021) तृणमूल काँग्रेस आणि भाजपने आपापली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र जारी केले. त्यावर आता काँग्रेसकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्या आणि नोकऱ्या कुठून देणार, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. (west bengal assembly election 2021 congress leader bhai jagtap criticize bjp over manifesto)
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजपने संकल्पपत्र म्हणजेच निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये प्रत्येक घरात एक नोकरी देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यावरूनच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी भाजपवर टीका केली आहे. एक ट्विट करून भाई जगताप यांनी भाजपच्या संकल्पपत्रावर निशाणा साधला आहे.
बंगाल मध्ये भाजपा चे घोषणपत्र जारी - प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देणार...
— Bhai Jagtap - भाई जगताप (@BhaiJagtap1) March 25, 2021
इथे आहेत त्या सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्यात, नोकरी कुठून देणार हे..??#झुठ्लर_मोदी_सरकार
काय म्हणाले भाई जगताप?
“बंगालमध्ये भाजपाचे घोषणपत्र जारी – प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देणार… इथे आहेत त्या सर्व सरकारी कंपन्या विकायला काढल्यात, नोकरी कुठून देणार हे..??”, असे ट्विट करत भाई जगताप यांनी भाजपला टोला लगावला आहे. रोजगार, सामाजिक सुरक्षा बळकट करणे आणि नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीला मंजुरी यांसारख्या उपाययोजनांद्वारे ‘सोनार बांगला’ची निर्मिती करण्याचे आश्वासन देणारा जाहीरनामा भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी जारी केला आहे.
गुड न्यूज! आता घरबसल्या ऑर्डर करा; पेट्रोल-डिझेलची मुंबई व दिल्लीत होम डिलिव्हरी
दरम्यान, भाई जगताप हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर केलेली टीका आणि त्यानंतर अमृता यांनी दिलेलं उत्तर आणि त्यावर पुन्हा जगताप यांनी साधलेला निशाणा यामुळे त्यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. आता थेट राजकीय व्यक्त करण्याऐवजी ट्विटरवरुन व्यक्त होणाऱ्या भाई जगताप यांनी आता पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने जाहीर केलेल्या निवडणुक जाहीरनाम्यावरुन निशाणा लगावला आहे.