कसली खलबते? अजित पवार तासाभरापासून सागर बंगल्यावर; राहुल नार्वेकरही पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 02:00 PM2023-07-03T14:00:48+5:302023-07-03T14:01:27+5:30
शरद पवारांनी वेगवान हालचाली करून जितेंद्र आव्हाड यांना प्रतोद नेमले आहे. या पेचावरही नार्वेकर, पवार आणि फडणवीस यांच्याच चर्चा होणार असल्याचे समजते आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते. सुमारे तासाभरापासून दोघांमध्ये बैठक सुरु होती. यावेळी राष्ट्रवादीचे आणि भाजपाचे नेते उपस्थित होते. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील सागर बंगल्यावर आले आहेत.
शरद पवारांनी वेगवान हालचाली करून जितेंद्र आव्हाड यांना प्रतोद नेमले आहे. याचबरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नार्वेकर यांना राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात आमदारांनी कृत्य केल्याने या ९ आमदारांना डिसक्वालिफाय करण्यात यावे अशी याचिका दाखल केली आहे. यामुळे अजित पवारांसमोर मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.
या पेचावरही नार्वेकर, पवार आणि फडणवीस यांच्याच चर्चा होणार असल्याचे समजते आहे. याचबरोबर अजित पवार यांच्या मंत्र्यांना कोणती खाती देणार यावर देखील चर्चा होणार आहे. देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडील काही खाती पवारांना देण्याची शक्यता आहे. अजित पवारांना पुन्हा अर्थ खाते मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर शिंदे यांच्यावर ठाकरे गटाची कारवाई होण्याची शक्यता आहे. शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले १६ आमदार यांच्यावर विधानसभा अध्यक्ष निर्णय़ घेणार आहेत. यामुळे शिंदे अपात्र ठरले तर अजित पवारांना मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द देण्यात आल्याचे संजय राऊत आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
दुपारी तीन वाजता अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत. तर शरद पवारांनी राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना धडा शिकविणार असल्याची घोषणा केली आहे. मीडियाशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ज्या ९ जणांनी आमच्या पक्षाच्या धोरणाविरोधात जाऊन भाजपाबरोबर शपथ घेण्याचे काम केले त्याच क्षणी ते ९ जण अपात्र ठरतात. त्यासंबधातील याचिका आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे. याबाबत मी सकाळी विधानसभा अध्यक्षांशी सविस्तर बोललो. आमची याचिका त्यांना मिळाली असल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. ते त्यावर विचार करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. आमचे म्हणणे मांडू द्यावे अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.