अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट का घेतली?; स्वत: समोर येऊन केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 04:58 PM2023-11-23T16:58:12+5:302023-11-23T16:59:06+5:30
आजच्या भेटीत मतमतांतरे नव्हती. जेव्हा विकास कामांचा मुद्दा असतो तेव्हा अजितदादांकडे कुठलेही बंधने नसतात तोच अनुभव आज पुन्हा आला असं अमोल कोल्हे म्हणाले.
मुंबई - एकीकडे खरी राष्ट्रवादी कुणाची हा वाद निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. याठिकाणी शरद पवार आणि अजित पवार गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशावेळी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या. कोल्हे यांनी अजितदादांची भेट घेणे हे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेचे कारण ठरले. कोल्हे अजित पवार गटात जाणार का असंही अनेकांच्या मनात प्रश्न पडला त्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी खुलासा केला आहे.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, मतदारसंघातल्या विकासकामांच्या दृष्टीने अजित पवारांची भेट घेतली. शिरूर मतदारसंघात २ प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. २०१९ च्या निवडणुकीवेळी महत्त्वाचे मुद्दे होते. बैलगाडा शर्यत, पुणे-नाशिक वाहतूक कोंडी यासारखे विषय होते. बैलगाडा शर्यत सुरू झाली. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प कॅबिनेटच्या मंजुरीसाठी रखडली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती देण्यासाठी आज ही भेट होती. त्याचसोबत इंद्रायणी मेडिसिटीसारखा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, ज्यात २६ सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल एका कॅम्पसमध्ये येणार आहे. हादेखील प्रकल्प पुढे कसा नेता येईल यासाठी ही भेट होती असं त्यांनी सांगितले.
तसेच आजच्या भेटीत मतमतांतरे नव्हती. जेव्हा विकास कामांचा मुद्दा असतो तेव्हा अजितदादांकडे कुठलेही बंधने नसतात तोच अनुभव आज पुन्हा आला. खासकरून इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प दादांना खूप आवडला. हा पथदर्शी प्रकल्प देशात शिरूर मतदारसंघात होतोय त्यासाठी दादा सकारात्मक आहेत असं कोल्हे यांनी म्हटलं. त्याचसोबत मी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याबाबत उद्या होणाऱ्या सुनावणीत स्पष्ट होईल. अमोल कोल्हे हा फार लहान कार्यकर्ता आहे. एकीकडे ३०-३५ वर्ष ज्यांनी राजकारणात घालवले ते नेते तर दुसरीकडे ५५ वर्ष महाराष्ट्र ज्यांना तळहाताच्या रेषांप्रमाणे ठाऊक आहे ते शरद पवार आहेत. त्यामुळे ते योग्य आणि महाराष्ट्राच्या हिताचा तोडगा काढतील असा विश्वास आहे असं कोल्हे यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी कुणाकडे असावी ही मागणी प्रत्येकाने करणे योग्य आहे. मी ज्या बाजूने आहे त्यांच्याकडे आला पाहिजे हे वाटणे स्वाभाविक आहे. पण निर्णय घेणारे निवडणूक आयोग जो निर्णय देतील त्यानुसार पुढील रणनीती ठरवली जाईल.पुरावे असल्याने आम्ही योग्य बाजू मांडतोय. जो काही निर्णय येईल त्यानुसार पुढची पाऊले टाकली जातील असंही खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं.