"शिकार करा आणि भिंतीवर टांगा"; पक्षांतर्गत वादावरून काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा नेत्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 11:42 AM2024-06-27T11:42:49+5:302024-06-27T11:59:42+5:30
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना गंभीर इशारा देत गटबाजी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Congress : लोकसभा निवडणुकीत देशासह राज्यातही काँग्रेसला चांगले यश मिळालं आहे. मात्र एवढ्या मोठ्या यशानंतरही पक्षात अनेक वाद सुरु असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षात गटबाजी उफाळून आली आहे. खासदार वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी काँग्रेसच्या एका गटाने केली आहे. यासाठी काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत वरिष्ठांची भेट घेतली होती. यावर आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पक्षांतर्गत गटबाजी करणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे.
जर कोणी ऐकत नसेल तर शिकार करा आणि भिंतीवर टांगा अशा शब्दात राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना दिला आहे. कोणी पक्षविरोधी कारवाई करत असेल तर पक्ष काय कारवाई करणार असा सवाल एका काँग्रेस नेत्याने केला होता. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी एका शिकारीची गोष्ट सांगितली. या चर्चेला मुख्य म्हणजे मुंबई काँग्रेसमधील वादाची किनार होती.
दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीमध्ये गटबाजी कराल तर याद राखा, असं काही केलं तर थेट कारवाईला सामोरं जावं लागेल असा गंभीर इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी दिला आहे. पक्षांतर्गत कुरघोड्या आम्हाला माहिती असून त्यामुळे या अशा प्रकारचे कृत्य नको. ते खपवून घेतले जाणार नाही, असा थेट इशारा मल्लिकार्जुन खरगे यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांना दिला आहे. वर्षा गायकवाड, नाना पटोले यांच्याविरोधात महाराष्ट्रातील काही गट हे खरगे यांना भेटले होते. त्याचा उल्लेखही या बैठकीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच रमेश चेन्नीथला यांना हे वाद मिटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी चैन्नीथला हे ४ जुलै रोजी मुंबईत येणार आहेत. पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत असाही इशारा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस नेत्यांना गटबाजी संपवा असं सांगितलं. त्यानंतर महाराष्ट्रातील एका नेत्याने म्हटलं की, पक्षात कोणतीही गटबाजी नाही असे म्हटलं. त्यावर काँग्रेस अध्यक्षांनी प्रत्युत्तर दिले की, "सकाळी नेत्यांचा एक गट आला होता आणि त्यांनी सांगितले की वर्षा गायकवाड यांना हटवा. त्यानंतर दुसरा गट येऊन म्हणाला की वर्षा गायकवाड यांनाच कायम ठेवा. तेवढ्यात इतर नेत्यांचा एक गट आला आणि म्हणाला, नाना पटोले यांना हटवा. त्यानंतर आणखी काही नेते आले आणि म्हणाले की, नाना पटोले अध्यक्षच राहिले पाहिजेत आणि तुम्ही लोक म्हणता की पक्षात गटबाजी नाही."