"ही कधीतरी एकत्र येतील का रं.."; अजितदादांनी अनेकांच्या मनातील शंका दूर केली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 01:13 PM2024-03-04T13:13:21+5:302024-03-04T13:17:38+5:30
शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात जी शंका होती, ती अजित पवारांनी सभेत मांडली, काय म्हणाले अजित पवार?
शिरुर - ५ वेळा उपमुख्यमंत्री, ८ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. शासनाच्या तिजोरीतला पैसा कशाप्रकारे वापरायचा हा निर्णय घेतला. सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करतोय. आम्ही वेगवेगळ्या काळात एकमेकांविरोधात निवडणूक लढलो होतो. परंतु परिस्थिती बदलून त्या त्या वेळी निर्णय घ्यावा लागतो असं सांगत अजित पवारांनी भविष्यात शरद पवारांसोबत एकत्र येण्यावर स्पष्टच भाष्य केले.
अजित पवारांनी म्हटलं की, मला १९९१ मध्ये पहिल्यांदा खासदार तुम्ही केले. तो काळ वेगळा होता. प्रचंड मताधिक्याने मला नवखा उमेदवार असताना पुढे पाठवले. त्यानंतर पुढच्या सहा महिन्यात राजकारण बदललं आणि मला राजीनामा द्यावा लागला. मग पुढे पुन्हा मी राज्याच्या राजकारणात आलो. शेतकऱ्यांच्या काय अडचणी, समस्या हे व्यवस्थित लक्षात घेऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न माझा असतो. आता सरळ सरळ दोन फाटा पडल्यात, काहीजण म्हणतात, ही कधीतरी एकत्र येतील का रं..यांनीच आमची निम्मी गार होतात. मग दबक्या आवाजात मला विचारतात, दादा पुढे काय होईल का? त्यामुळे आजही लोकांच्या मनात तशाप्रकारची शंका आहे. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो असं काही होणार नाही असंही अजितदादा म्हणाले.
३-४ दिवसांत आचारसंहिता लागेल
मी महायुतीच्या सरकारमधील घटकपक्ष म्हणून काम करतोय. आम्ही महायुतीचा उमेदवार देणार आहे. शिरुरमध्ये समस्या खूप आहेत. एमआयडीसीचे प्रश्न आहेत, नदीतील पाण्याची समस्या आहे. यंदा दुष्काळी वर्ष आहे तरीही पाण्याचे काटकसरीने नियोजन करून पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केला. सत्तेत नव्हतो तेव्हा अडचणी येत होत्या. शेवटी पिकाला वेळचेवेळी पाणी मिळालं पाहिजे याबाबत दुमत नाही. मी आज इथं आलो असताना अनेक प्रकारची निवेदने आपल्याला मिळाली. पालकमंत्री म्हणून मी सगळ्यांना मदत करतो. आठवडाभरात आचारसंहिता लागेल. मार्च-एप्रिल आचारसंहिता लागू असेल असं अजित पवारांनी म्हटलं.
शिरुरकरांना साद, मला साथ द्या
निलेश लंकेच्या मतदारसंघात माझं नाटक आहे असं सांगून अमोल कोल्हे उठले, त्यापाठोपाठ अशोकही उठले. कार्यक्रम होईपर्यंत थांबा असं त्यांना सांगितले. छत्रपती संभाजीराजेंमुळे तुमची ओळख झाली आणि त्यांच्या कार्यक्रमातून मध्येच उठून गेले. लोकशाही आहे. ज्याला बसायचे तो बसतो, ज्याला जायचं तो जातो. जशी १९९१ साली मला साथ दिली, त्यानंतरही अडचणीत मला साथ दिली मला साथ द्या असं सांगत अजित पवारांनी शिरुरकरांना साद घातली.