शिवाजी आढळराव पाटलांना मिळणार अजितदादांची साथ?; अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढणार
By प्रविण मरगळे | Published: December 26, 2023 02:42 PM2023-12-26T14:42:11+5:302023-12-26T14:50:47+5:30
५ वर्ष शेतकऱ्यांनी तुमच्याविरोधात आक्रोश केला. तेव्हा तुम्ही कुठे होता? आज आक्रोश यात्रा काढली जाते हा बालिशपणा आहे अशा शब्दात आढळरावांनी कोल्हेंवर टीकास्त्र सोडलं.
पुणे - Shivaji Adhalrao Patil on Ajit Pawar ( Marathi News ) महायुतीत अद्याप जागावाटप झाले नाही. प्रत्येक पक्ष आपापला दावा करेल.अजितदादांचा नैसर्गिक दावा या मतदारसंघावर राहतो.कारण त्यांनी शिरुरची जागा जिंकली आहे. पुणे जिल्ह्यात त्यांचे प्राबल्य आहे. त्यांनी या जागेवर दावा करणे चुकीचे आहे असं नाही. मी ५ वर्ष मेहनत करतोय त्यामुळे आमचाही दावा आहे. पण जागावाटप होईल त्यावेळी ही जागा कोणाच्या वाट्याला जाईल ते ही जागा लढवतील असं विधान शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केले आहे. आढळराव पाटलांसोबत लोकमत डॉट कॉमने संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना इशारा दिल्यानंतर आता शिरूर मतदारसंघात कोण उभा राहील याचीच चर्चा मतदारसंघात सुरू आहे. त्यातच शिवाजी आढळराव पाटील अजितदादा गटासोबत जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आढळराव पाटील यांनी या चर्चा खोडसाळ असून महायुतीचा उमेदवार आम्ही निवडून आणू अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की, गेल्या ५ वर्षापासून मी मतदारसंघात लोकांशी संवाद साधतोय, विकासकामे, मेळावे, दौरे, भेटीगाठी सुरू आहेत. महाराष्ट्रातून कमीत कमी ४५ जागा महायुतीला निवडून आणायच्या आहेत त्यामुळे जागा कोणालाही गेली तरी इतर २ पक्षांना ते मान्य करावे लागणार आहे. उद्या जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली तरी माझी काही तक्रार राहणार नाही. मित्रपक्ष म्हणून ज्यावेळी जागावाटपाची चर्चा होईल तेव्हा पुढे काय हे ठरवू. सध्या जर तर वर भाष्य करणार नाही असं सांगत आढळरावांनी अजितदादा गटासोबत जाण्याबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.
तसेच अजितदादा म्हणाले संघर्ष यात्रा, आक्रोश यात्रा आता सुचली, ५ वर्ष सुचली नाही. अजितदादा बोलले ते बरोबर आहे. ५ वर्ष या मतदारसंघातील जनता कोल्हेंविरोधात आक्रोश करत होती. तुम्ही या आमची कामे करा, भेटा, दर्शन द्या असा आक्रोश लोकांचा ५ वर्ष होता. त्याच्याकडे कोल्हेंनी दुर्लक्ष केले. त्यामुळे आता निवडणुका आल्या तेव्हा शेतकऱ्यांचा आक्रोश दिसायला लागला आहे. हा प्रकार काय आहे? ५ वर्ष शेतकऱ्यांनी तुमच्याविरोधात आक्रोश केला. तेव्हा तुम्ही कुठे होता? आज आक्रोश यात्रा काढली जाते हा बालिशपणा आहे. तुम्ही कुठे आंदोलन केले? रस्त्यावर उतरले? निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कोल्हे हा प्रकार करत आहेत असा निशाणा आढळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हेंवर साधला.
दरम्यान, अजित पवार सरकारसोबत आल्यानंतर निश्चितच शिरूर लोकसभा मतदारसंघात ताकद वाढली आहे. तिन्ही पक्ष एकत्रित लढल्यावर शिरूरची जागा १०० टक्के महायुती निवडून येणार असा विश्वासही शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळराव इच्छुक आहेत. त्यात अजित पवार गट सत्तेसोबत आल्यानं आढळराव पाटील कोणत्या चिन्हावर शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार हे पाहणे गरजेचे आहे.
शिरुर लोकसभेचं गणित कसं आहे?
शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात भोसरी, शिरुर, हडपसर, खेड, जुन्नर आणि आंबेगाव..आता खेड, हडपसर, जुन्नर आणि आंबेगाव हे चारही आमदार अजितदादांसोबत आहे.भोसरी येथील महेश लांडगे ते भाजपाचे आहेत. शिरुरमधील १ आमदार ते शरद पवार गटाकडे आहेत. त्यामुळे अशोक पवार वगळता इतर सर्व विरोधी बाकांवर आहे. त्यामुळे मतदारसंघातील विजय सुखकर करण्यासाठी मध्यंतरी कोल्हे अजितदादांसोबत येतील अशी चर्चा होती. परंतु २ दिवसांपासून या चर्चेस पूर्णविराम मिळाला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अतुल बेनके, दिलीप मोहिते, दिलीप वळसे पाटील यासारखी दिग्गज मंडळी एकाबाजूला आहेत त्यामुळे या मतदारसंघात महायुती कोणाला तिकीट देणार हे पाहणे गरजेचे आहे.