काँग्रेस-राष्ट्रवादी वाद वाढला, नाना पटोलेंची हायकमांडकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 01:05 PM2022-05-16T13:05:40+5:302022-05-16T13:16:49+5:30
राष्ट्रवादीने आमच्या पाठित खंजीर खुपसल्याचा आरोप पटोलेंनी केला. त्यावर अजित पवारांनी पटोलेंना उत्तर दिले. यानंतर, पटोलंनी पुन्हा यावर भाष्य केले आहे.
नागपूर : गोंदिया-भंडारातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वातावरण तापले असून आरोप-प्रत्यारोपाचे बाण मारणे सुरुच आहे. राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केला. त्यावर अजित पवारांनी पटोलेंना उत्तर दिले. यानंतर, पटोलंनी पुन्हा यावर भाष्य केले आहे. भाजपला थोपण्यासाठी काँग्रेससोबत आलेली राष्ट्रवादी भाजपला मदत करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भाजपला पडद्यामागून मदत करण्याचं राजकारण करत आहे. अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनलं होतं आता त्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अपमान होत असून आम्ही ते सहन करणार नाही. राष्ट्रवादीच्या भूमिकेची आम्ही पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठी लवकरच त्या तक्रारीबद्दल निर्णय घेतील व येणाऱ्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील. आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही, असं पटोले म्हणाले.
नुकतेच काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबीर उदयपूरमध्ये पार पडले. यामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह देशाच्या सीमासुरक्षा बाबतीतही चर्चा झाली. काँग्रेसला देशाची चिंता आहे सध्या देशात राज्यघटना व लोकशाही धोक्यात आली आहे. श्रीलंकेसारखी स्थिती होत आहे आणि त्यावरच या चिंतन शिबिरामध्ये चर्चा झाली. यासह 'एक कुटुंब-एक तिकीट' हा फॉर्म्युला ठरविण्यात आला. हाच नियम आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, महापालिकांच्या निवडणुकांमध्ये लागू करण्यात येईल, असं पटोले यांनी सांगितलं.
जे लोक माझ्याबद्दल बोलतात, त्यांनी आपली पार्श्वभूमी तपासावी
अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, नाना पटोले लोकांसाठी जगणारा कार्यकर्ता असून माझा इतिहास सर्वांना माहित आहे. सत्तेत राहून गद्दारी करण्याचं काम नाना पटोलेंनी केलं नाही. जे लोक माझ्याबद्दल बोलतात, त्यांनी आपली पार्श्वभूमी तपासावी, असे प्रत्युत्तर पटोलेंनी दिले.