नव्या गुलामगिरीविरुद्ध लढू अन् जिंकू! राहुल गांधी यांनी नागपुरातून व्यक्त केला निर्धार
By कमलेश वानखेडे | Published: December 29, 2023 06:00 AM2023-12-29T06:00:17+5:302023-12-29T06:01:22+5:30
‘है तैयार हम’ महारॅलीतून फुंकला निवडणुकीचा बिगुल, देशाची सूत्रे जनतेच्या हाती देण्यासाठी उभारणार लढा.
कमलेश वानखेडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : स्वातंत्र्यापूर्वी सामान्य, गरीब जनतेला त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी काँग्रेस ब्रिटिश व राजा-महाराजांच्या विरोधात लढली. केंद्र सरकार स्वातंत्र्यापूर्वीच्या त्या काळात पुन्हा देशाला नेऊ पाहत आहे. मूलभूत अधिकारांवर गदा आणली जात आहे. या नव्या गुलामगिरीविरोधातही काँग्रेस लढेल आणि जिंकेल, असा निर्धार काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवारी नागपुरातील बहादुरा येथील मैदानावर ‘है तैयार हम’ महारॅली आयोजित करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, गटनेेते बाळासाहेब थोेरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महासचिव मुकुल वासनिक यांच्यासह देशभरातील काँग्रेस नेते उपस्थित होते. या रॅलीच्या निमित्ताने काँग्रेसने लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला.
राहुल गांधी म्हणाले, भाजपमध्ये वरून आलेल्या आदेशाचे पालन करावे लागते. काँग्रेसमध्ये एक सामान्य कार्यकर्ताही नेत्याला प्रश्न विचारू शकतो. भाजपची विचारधारा ही राजेशाहीची आहे. तर काँग्रेसची विचारधारा म्हणते की, देशाची सूत्रे जनतेच्या हाती असावीत. त्यासाठी आम्ही लढा देत आहोत.
सत्ता येताच ‘न्याय योजना’ लागू करणार : खरगे
भाजप प्रणित केंद्र सरकारने विविध काळे कायदे करीत नागरिकांचे अधिकार हिरावून घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास ‘न्याय योजना’ लागू करेल. यातून महिलांना ७० हजार रुपये मिळतील, अशी घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. भाजप-आरएसएसचे सरकार संपले नाही, तर देशातील लोकशाही व संविधान संपेल, असा धोका त्यांनी वर्तविला. इंडिया आघाडी एकत्र येऊन लढली तर भाजप कुठेच दिसणार नाही. त्यामुळेच इंडिया आघाडीला फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यांच्या खोट्या आश्वासनांची पोल खोल झाली आहे. त्यामुळेच आता हे लोक देवाकडे लागले आहेत. ते भजन करत तुमच्याकडे येतील. पण, देशाला वाचवायचे असेल तर इंडिया आघाडीलाच मत द्या, असे आवाहनही खरगे यांनी केले.
जातनिहाय गणना करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आधी स्वत:ला ओबीसी म्हणवत होते. मात्र, आपण संसदेत देशात ओबीसी किती आहेत, असा प्रश्न विचारल्यापासून त्यांनी भाषण बदलले. प्रत्येकाला लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मिळायला हवा. त्यामुळे केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येताच जातनिहाय गणना केली जाईल, अशी हमी राहुल गांधी यांनी दिली.
स्वायत्त संस्थांवरही होतोय कब्जा
सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग यासारख्या संस्थांवर कब्जा केला जात आहे. देशातील विद्यापीठांचे कुलगुरू हे आता मेरिटवर नियुक्त केले जात नाहीत. ते विशिष्ट संघटनेचे असतील, तरच नियुक्ती होते. अशा परिस्थितीत काँग्रेस लोकशाहीचे रक्षण करीत असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
महारॅलीला देशभरातील नेत्यांची उपस्थिती
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख्खू, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेस समितीचे कोषाध्यक्ष अजय माकन, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस नेते जयराम रमेश, तारीक अन्वर, सलमान खुर्शिद, सचिन पायलट, मुरली देवरा, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी, छत्तीसगड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैस, कन्हैयाकुमार, खा. इमरान प्रतापगडी, खा. नासीर हुसैन, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई आदी राष्ट्रीय नेते उपस्थित होते.
महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे. म्हणूनच आम्ही नागपुरात आलो आहोत. तुम्ही ‘बब्बर शेर’ आहात, कुणाला घाबरणारे नाहीत. महाराष्ट्रात काँग्रेस निवडणूक जिंकणारच.- राहुल गांधी, काँग्रेस नेते