राहुल गांधी द्रष्टे नेते, २०२४ साली ते पंतप्रधान होतील : नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 03:09 PM2022-03-30T15:09:49+5:302022-03-30T15:22:24+5:30
२०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस भाजपचा पराभव करेल व राहुल गांधी पंतप्रधान होतील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
नागपूर : 'राहुल गांधी द्रष्टे नेते आहेत. २०२४ साली ते पंतप्रधान होतील' असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबतचे ट्विट शेअर केल्यानंतर त्यावरून चर्चा रंगू लागल्या आहेत.
२०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला खोटे आश्वासन देऊन स्वप्न दाखवली मात्र ते पूर्ण करण्यात अपयशी ठरले. त्याऐवजी खासगीकरणाचा सपाटा त्यांनी लावला आहे. याच्यामुळे देशात महागाई, बेरोजगारी वाढत चालली आहे. यामुळे जनता त्रस्त झाली आहे. तर, राहुल गांधी यांच्याकडे देशासाठी व्हिजन आहे. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर येईल आणि राहुल गांधी हे पंतप्रधान होतील, असा आशावाद पटोले यांनी व्यक्त केला आहे.
राहुल गांधी द्रष्टे नेते आहेत. २०२४ साली ते पंतप्रधान होतील.
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 30, 2022
देशात जीएसटी, लागू केल्यानंतर राहुल गांधींंनी त्याच्या दुष्परिणामाविषयी सांगितले होते. कोरोना महामारीबाबतही त्यांनी सूचित केले होते, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, त्यांची थट्टा करण्याच काम भाजपने केलं. भाजप नेते नेहमी काँग्रेसला दोष देत फिरतात. मोदी संसदेत भाषण देताना नेहमी नेहरूमुळे महागाई वाढल्याचे सांगतात. म्हणजे नेहरू अजूनही मोदीच्या स्वप्नात येतात. काँग्रेसचे सर्वच पंतप्रधानांनी देशाला फक्त दिले आहे, देशाकडून काही घेतलं नाही. याउलट ८ वर्षे बहुमताची सत्ता असतानाही सरकारने देशाला प्रगतीकडे नेण्यापेक्षा देशाला ५० वर्षे मागे नेले असून आपल्या चुकीच्या गोष्टी लपविण्यासाठी गांधी परिवाराला बदनाम करण्याचा अपप्रचार सुरू आहे, असेही पटोले म्हणाले.
काँग्रेस बाप आहे, बापच राहणार
राष्ट्रवादी नवरा आहे, शिवसेना बायको आहे आणि काँग्रेस वऱ्हाडीच्या भूमिकेत आहे, अशी प्रतिक्रिया नुकतीच भाजपा खासदार सुजय विखे यांनी केली होती. यावर नाना पटोले यांनी काँग्रेस बाप आहे, बापच राहणार असा प्रतिटोला सुजय विखे पाटील यांना लगावला होता. सुजय विखे नवखे आहेत. त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही असंही नाना पटोलेंनी म्हटलं होतं.