नागपुरात ६ नोव्हेंबरला संविधान संमेलनात राहुल गांधींची उपस्थिती

By कमलेश वानखेडे | Published: November 2, 2024 08:02 PM2024-11-02T20:02:12+5:302024-11-02T20:02:30+5:30

ओबीसी युवा अधिकार मंचचे आयोजन

Rahul Gandhi presence in the Constituent Assembly on November 6 in Nagpur | नागपुरात ६ नोव्हेंबरला संविधान संमेलनात राहुल गांधींची उपस्थिती

नागपुरात ६ नोव्हेंबरला संविधान संमेलनात राहुल गांधींची उपस्थिती

नागपूर : ओबीसी युवा अधिकार मंच संघटनेतर्फे ६ नोव्हेंबर रोजी नागपुरात संविधान संमेलन आयोजित करण्यात आले असून या संमेलनात काँग्रेस नेते राहुल गांधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

वडेट्टीवार यांनी सांगितले की, ओबीसी युवा अधिकार मंच संघटनेचे उमेश कोराम, अनिल जयहिंद यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असून त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून राहुल गांधी या संमेलनात सहभागी होण्याचे मान्य केले आहे. सुरेश भट सभागृह येथे सकाळी ११ वाजता हे संमेलन होईल. या संमेलनात ‘मनुवाद, संविधान, मनुस्मृती महिलांचे स्थान काय, शिवशाही आणि मनुस्मृतीमध्ये किती फरक आहे’ या विषयावर चर्चा होणार आहे.

राज्यातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी संमेलनात सहभागी होतील. या संमेलनाला कुठलेही राजकीय स्वरुप नाही. काँग्रेसकडून कुणालाही निमंत्रित करण्यात आले नाही. आदर्श आचारसंहितेचे कुठलेही उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केेले. या कार्यक्रमानंतर राहुल गांधी हे दुपारी २ वाजता मुंबईसाठी रवाना होतील. तेथे काँग्रेसतर्फे जनतेला दिलेल्या पाच गॅरंटीचे प्रकाशन होईल. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी विदर्भासह महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत. त्याच्या तारखा लवकरच जाहीर करू, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केेले. पत्रकार परिषदेला माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष नागा गावंडे, अनिल जयहिंद, उमेश कोराम आदी उपस्थित होते.

अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे धडे हा धोका

कार्यक्रमाचे आयोजक अनिल जयहिंद म्हणाले की, महाराष्ट्रात अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे धडे दिले जाणार आहेत, हा देशाला मोठा धोका आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याचा डाव आहे. संविधानाने आपले रक्षण केले आहे. देशातील प्रत्येक माणसाला संविधानामुळे हक्क मिळाले. आता संविधान बदलून मनुस्मृती आणली तर काय होईल ही भीती लोकांच्या मनात आहे.
 

Web Title: Rahul Gandhi presence in the Constituent Assembly on November 6 in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.