राज्यात राहुल, प्रियंका गांधी यांच्या सहा सभा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती
By कमलेश वानखेडे | Published: April 7, 2023 05:53 PM2023-04-07T17:53:55+5:302023-04-07T17:56:40+5:30
यातील पहिली सभा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता
नागपूर : राज्यात काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी व राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सहा सभा होणार आहेत. १० एप्रिल रोजी ठाणे येथे आयोजित प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल. यातील पहिली सभा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या सभा महाविकास आघाडीची सभा नसुन काँग्रेसची सभा राहणार आहे. मात्र, सहयोगी पक्षांच्या नेत्यांना देखील निमंत्रण राहील. कर्नाटक निवडणुकीनंतर उर्वरित सभा घेतल्या जातील, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. नागपुरात १६ एप्रिल रोजी आयोजित महाविकास आघाडीची सभा होऊ नये, असे भाजपचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. आशिष देशमुख यांच्यावरील कारवाईबाबत ते म्हणाले, शिस्तपलन समितीची बैठक झाली आहे. त्यांचेही म्हणणे ऐकून घेणे महत्वाचे आहे. आमच्या पक्षात हिटलरशाही नाही.
मी सुद्धा अयोध्येला जाणार
- शिंगे गटाच्या अयोध्या दौऱ्याबाबत विचारणा केली असता केली पटोले म्हणाले, प्रभु राम आपले दैवत आहेत. मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे. अयोध्येला जाण्यात काही गैर नाही. आम्ही देखील रामनवमी आणि हनुमान जयंती साजरी केली. आम्हाला शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मान्य आहे. सर्वसमावेशक हिंदुत्व आम्हाला मान्य आहे.
पुणे निवडणुकीबाबत शंका
- पुणे लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अद्याप कुठल्याही पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. भाजप पुण्यात निवडणूक लावेल की नाही याबाबतच शंका असल्याचे पटोले यांनी सांगितले.