...तोपर्यंत अदानीच्या घोटाळ्यावर प्रश्न विचारत राहू - रंजीत रंजन
By आनंद डेकाटे | Published: March 31, 2023 04:29 PM2023-03-31T16:29:10+5:302023-03-31T16:31:29+5:30
जीपीसी गठीत करा, लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकजूट
नागपूर : अदानीचा घोटाळा गंभीर आहे. अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रूपये कुणी लावले. अदानीची संपत्ती अचानक इतकी कशी वाढली. या प्रश्नांचे उत्तर देशाला मिळायलाच हवे. त्यामुळे केंद्र सरकार जोपर्यंत जेपीसी (जॉईंट पार्लमेंट्री कमिटी) स्थापन करीत नाही, तोपर्यंत अदानीच्या घोटाळ्याबाबत बोलत राहू, सरकारला जाब विचारत राहू, असा इशारा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय महासचिव व प्रवक्त्या रंजीत रंजन यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.
राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली. त्यांचे लोकसभा सदस्यपद रद्द करण्यात आले. त्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षही एकजूट होत आहेत. काँग्रेसतर्फे देशभरात पत्रकार परिषदा घेऊन व लोकांमध्ये जाऊन हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी खा. रंजीत रंजन यांनी नागपुरात पत्रपरिषद घेऊन काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.
खा. रंजीत रंजन म्हणाल्या, सत्ताधारी पक्षाचे चुकीचे धोरण आणि घोटाळ्यावर सरकारला जाब विचारणे हे विराेधी पक्षाचे काम असते. विरोधी पक्षाचे नेते म्हणून राहुल गांधी यांनी हे काम अगदी चोखपणे बजावले. यात राहुल गांधी यांचे काय चुकले? असा प्रश्न ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. जेपीसी गठीत झाली तर आपले पितळ उघडे पडेल, याची सरकारला भिती असल्याचेही त्या म्हणाल्या. पत्रपरिषदेला जि.प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, आ. अभिजित वंजारी, माजी मंत्री सुनील केदार, राजेंद्र मुळक, किशोर गजभिये आदी उपस्थित होते.
- राहुल गांधी यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई
विरोधी पक्षाने आमच्या भ्रष्टाचारवर बोलू नये. संसदेत तर चर्चाच नको, आणि चर्चा केलीच तर आम्ही तुमचे सदस्यत्व सुद्धा रद्द करू शकतो, हे संकेत आहेत. केंद्र सरकार राहुल गांधीवर सुडबुद्धीने कारवाई करीत आहे. आज राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाली उद्या इतर पक्षाच्या नेत्यांसोबतच हे होऊ शकते. त्यामुळे लोकशाहीच संकटात आली असून ती वाचवण्यासाठी सर्व देशातील सर्व राजकीय पक्ष एकजूट आहेत, असेही खा. रंजीत रंजन यांनी सांगितले.