विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले
By कमलेश वानखेडे | Published: September 19, 2024 09:34 PM2024-09-19T21:34:41+5:302024-09-19T21:36:44+5:30
खोटं बोलायचं रेटून बोलायचं, आपल्या राज्याची बदनामी करण्याचे एकमेव काम विरोधी पक्ष करीत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढविला.
नागपूर : राज्यात नामांकित कंपन्या येत आहेत. दोन वर्षांच्या कारकीर्दीत पाच लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. स्टील इंडस्ट्री, सोलारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. विरोधी पक्षाला आता दुसरे काही काम नाही. खोटं बोलायचं रेटून बोलायचं, आपल्या राज्याची बदनामी करण्याचे एकमेव काम विरोधी पक्ष करीत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढविला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरुवारी सायंकाळी नागपुरात आगमन झाले. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अनेक प्रकल्प आपण पूर्ण केले. राज्यासाठी सगळे ‘पॉझिटिव्ह’ सुरू असताना विरोधक उद्योग गेल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत असेच खोटं बोलून त्यांनी मत घेतली. लाडकी बहिण योजनेच्या विरोधात कोर्टात गेले आहेत. काँग्रेस नेते सुनील केदार लाडकी बहिणी योजना बंद करण्याचे म्हणत आहेत. विरोधकांच्या पोटात दुखतेय, पायाखालची वाळू सरकली पण जनता त्यांना माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.
राहुल गांधी हे विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करतात. आरक्षण रद्द करू, असे पंडित नेहरूंपासून तर अनेक काँग्रेस नेते बोलले आहेत. आज काँग्रेस नेते जे आंदोलन करत आहेत ते त्यांनी राहुल गांधी यांच्या घरासमोर करायला हवे. आरक्षण कोणी हटवू शकत नाही. संविधान कोणी बदलू शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.