BharatJodoYatra: घाबरलेल्या भाजपकडून आमचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न
By शिवराज बिचेवार | Published: November 9, 2022 12:13 PM2022-11-09T12:13:25+5:302022-11-09T12:15:41+5:30
ही चुनाव जितो यात्रा नाही, परंतू यात्रेमुळे काँग्रेसला संजीवनी
नांदेड- येणाऱ्या निवडणुकीत या यात्रेचे काय परिणाम होतील याचा आम्ही विचार करीत नाही. तो येणारा काळ ठरवेल. परंतु एवढे मात्र नक्की या यात्रेमुळे भाजप मात्र घाबरली आहे, त्यामुळेच दररोज टी शर्ट कोणते घातले?, काय जेवण केले? यावरून टीका करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केला.
भारत जोडो यात्रा नायगाव येथे पोहचल्यानंतर रमेश यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मोदी यांनी कोणताही विचार न करता नोटबंदी केली. त्यामुळे उद्योग, शेतकरी यासह सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत ही भारत जोडो यात्रा काढली आहे. निवडणुकीत या यात्रेचे काय परिणाम होतील याचा आम्ही विचार करीत नाही. तो येणारा काळ ठरवेल. परंतु एवढे मात्र नक्की या यात्रेमुळे भाजप मात्र घाबरली आहे, त्यामुळेच दररोज टी शर्ट घातले, काय जेवण केले यावरून टीका करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारण पहिल्यांदाच काँग्रेस एवढ्या आक्रमक पणे राजकीय एजंडा घेऊन रस्त्यावर उतरली आहे.
राहुल यांच्या ६५ दिवसांत ५ प्रेस
या देशात 12 वर्ष राज्याचा आणि आठ वर्षे देशाचा पंतप्रधान असलेल्या व्यक्तीने अद्याप एकही प्रेस घेतली नाही, तर राहुल गांधी यांच्या गेल्या 65 दिवसात 5 प्रेस झाल्या आहेत. पुढची पत्रकार परिषद 17 तारखेला शेगाव येथे होणार आहे. असेही रमेश म्हणाले.
कॉंग्रेसला मिळाली संजीवनी
राज्यात होत असलेल्या निवडणुका किंवा 2024 ची लोकसभा समोर ठेऊन आम्ही ही भारत जोडो यात्रा काढली नाही. त्यामुळे ही चुनाव जितो यात्रा नाही. परंतु या यात्रेमुळे काँग्रेस ला मात्र संजीवनी मिळाली असून ती पुनरुज्जीवत झाली आहे.