Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या चालण्याचा प्रचंड वेग, नेते अन् कार्यकर्त्यांची दमछाक
By शिवराज बिचेवार | Published: November 8, 2022 12:11 PM2022-11-08T12:11:09+5:302022-11-08T12:13:03+5:30
वयाच्या 52 व्या वर्षी राहुल गांधी यांची फिटनेस सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.
नांदेड- राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात मंगळवारचा दुसरा दिवस. सकाळी साडे आठ वाजता वन्नली येथून या यात्रेला सुरवात झाली. काही मिनिटात ही यात्रा वझरगावच्या पुढे होती. राहुल गांधी यांच्या चालण्याच्या प्रचंड गतीमुळे नेते अन कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत होती.
वयाच्या 52 व्या वर्षी राहुल गांधी यांची फिटनेस सर्वांच्या कौतुकाचा विषय होता. सोमवारी रात्री वन्नली येथे रात्री बारा वाजता गुरुद्वारा येथे गुरुनानक जयंती निमित्त त्यांनी अरदास केली. त्यानंतर रात्री भोजन अन मग विश्रांती ला जवळपास दोन वाजले होते. त्यानंतर ही मंगळवारी सकाळी नियोजित वेळी ही यात्रा सुरू झाली.
वन्नली येथून सुरू झालेल्या यात्रेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते अन कार्यकर्ते सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्या चालण्याचा वेग एवढा जास्त होता की सोबतच्या नेते आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या सोबत चालण्यासाठी अक्षरशः धावावे लागत होते. त्यामुळे अनेक जण मागे पडत होते.