राहुल गांधीनी केले दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 12:07 PM2024-09-05T12:07:37+5:302024-09-05T12:08:40+5:30
नायगाव येथील चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले, अमित देशमुख, आणि अन्य नेत्यांनी चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले.
नांदेड: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या नायगाव येथील निवासस्थानी भेट दिली. नायगाव येथील चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले, अमित देशमुख, आणि अन्य नेत्यांनी चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले. दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या प्रतिमेला काँग्रेस नेत्यांनी पुष्प अर्पण केले. यावेळी राहुल गांधी यांनी चव्हाण कुटुंबांची संवाद साधला. त्यानंतर राहुल गांधी, खर्गे आणि इतर नेते सांगली येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
१४ दिवस मृत्यूशी झुंज
१३ ऑगस्ट रोजी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणाहून एअर ॲम्ब्युलन्सद्वारे त्याच दिवशी हैदराबाद येथे हलविण्यात आले. हैदराबाद येथील रुग्णालयात १४ दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर खा. वसंतराव चव्हाण १४ दिवस मृत्यूशी झुंज देत होते. अखेर २६ ऑगस्ट रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. वसंतराव यांच्यावर मंगळवार २७ ऑगस्ट रोजी शासकीय इतमामात नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या चाहत्यांनी साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक दाखल झाले होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत आदरांजली वाहिली. पोलिस पथकाने तीन राऊंड झाडून सलामी दिली. पार्थिव देहास खा. वसंतराव चव्हाण यांचे धाकटे चिरंजीव रणजित चव्हाण यांनी अग्नी दिला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले व त्यांनी वसंतराव चव्हाण अमर रहे च्या घोषणा दिल्या.
काँग्रेसला नांदेड जिल्ह्यात संजीवनी देणारे खासदार वसंतराव चव्हाण
१५ ऑगस्ट १९५४ ला जन्म झालेले वसंतराव चव्हाण यांना राजकारणाचे बाळकडू त्यांचे वडील बळवंतराव चव्हाणांकडून मिळाले. १९७८ मध्ये ते नायगावचे पहिल्यांदा सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग २४ वर्षे ते या पदावर होते. १९९० मध्ये जिल्हा परिषदेत निवडून आले. त्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष, विविध सोसायट्यांचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले. २००२ मध्ये राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा विधान परिषद सदस्य म्हणून निवडून गेले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष निवडून आले. त्यानंतर २०१४ मध्ये काँग्रेसकडून त्यांनी नायगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपत गेल्यामुळे काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय झाली होती. अशावेळी भाजप उमेदवाराच्या तोडीस तोड म्हणून वसंतराव चव्हाण यांना काँग्रेसने रिंगणात उतरविले. त्यांच्या प्रकृतीबाबत टीकाटिप्पणी केल्यानंतर त्यांनी एखाद्या कसलेल्या पहिलवानासारखे भरसभेत दंड थोपटून आव्हान दिले होते, तसेच लोकसभेत प्रतापराव चिखलीकर यांचा तब्बल ५० हजारांहून अधिक मतांनी पराभव करीत काँग्रेसचा नांदेड गड शाबूत ठेवला होता. त्यांच्या या विजयामुळे काँग्रेसला जिल्ह्यात संजीवनी मिळाली होती.