राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’त पवार, ठाकरे होणार सहभागी; ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 07:53 AM2022-11-02T07:53:16+5:302022-11-02T07:53:24+5:30
७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात आगमन, दोन शहरांत जाहीर सभा
नांदेड : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात देगलूर येथून दाखल होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर आदी सहभागी होणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
कन्याकुमारीपासून निघालेली ही ‘भारत जोडाे’ यात्रा तेलंगणात पोहोचली आहे. यात्रेच्या महाराष्ट्रातील कार्यक्रमाची माहिती देताना चव्हाण यांनी सांगितले की, यात्रेत सहभागी होण्यासाठी शरद पवार हे ८ नोव्हेंबर राेजी नांदेडात मुक्कामी असतील आणि ९ नोव्हेंबर रोजी ते नायगाव येथून यात्रेत सहभागी होतील. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी सहभागी होणार आहेत.
नांदेड जिल्ह्यात १२० किलोमीटरचा प्रवास
भारत जोडो यात्रेचे आगमन देगलूर तालुक्यातून होणार आहे. सर्वाधिक १२० किलोमीटरचे अंतर नांदेड जिल्ह्यात असेल. देगलूर, शंकरनगर, कृष्णूर, जवाहरनगर तुप्पा, नांदेड, अर्धापूर असे सहा दिवस यात्रा नांदेडात मुक्कामी राहणार आहे.
‘धर्मांधता, जातीयवाद थांबविण्यासाठी यात्रा’
ही ‘भारत जोडो’ यात्रा देशातील वाढती धर्मांधता, जातीयवाद रोखण्यासाठी आहे. १७, १८ व १९ नोव्हेंबर असे तीन दिवस राज्यात सर्वच जिल्हा शाखांनी वातावरण निर्मितीसाठी पदयात्रा, प्रभातफेरी आयोजित केली आहे, असे माजी मुख्यमंत्री व या यात्रेचे राज्यातील समन्वयक पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
या जिल्ह्यांतून जाणार यात्रा
नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. नांदेड आणि शेगाव येथे राहुल गांधी यांची जाहीर सभादेखील होणार असल्याचे चव्हाण म्हणाले. त्यानंतर ही यात्रा मध्य प्रदेशकडे रवाना होईल.