कोरोनामुळे महसूल कमी, त्यामुळे निधी मिळत नाही; काँग्रेस नाराज नाही- बाळासाहेब थोरात
By मोरेश्वर येरम | Published: November 20, 2020 03:43 PM2020-11-20T15:43:16+5:302020-11-20T15:46:38+5:30
''आमच्यात कोणताही वाद नाही, काँग्रेस पक्षही कोणावर नाराज नाही. कोरोनावर खर्च होत असल्यामुळे सरकारी तिजोरीतील निधी कमी पडतो आहे''
नाशिक
महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा कमी निधी मिळत असल्याचा आरोप केला जात होता. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
'आमच्यात कोणताही वाद नाही, काँग्रेस पक्षही कोणावर नाराज नाही. कोरोनावर खर्च होत असल्यामुळे सरकारी तिजोरीतील निधी कमी पडतो आहे. सध्या पैशांची आवकही कमी आहे आणि खर्च जास्त आहेत. त्यामुळे काही खात्यांना निधी कमी पडत आहे', असं बाळासाहेब थोरात म्हणाले. ते नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत सापत्न वागणूक मिळत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दिवाळीच्या आधी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला पॅकेज जाहीर करण्यात आलं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. तसंच पॅकेज एमएमईबीला देखील मिळायला हवं होतं, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवलं होतं. दुसरीकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा वीज बिलातील सवलतीचा प्रस्तावही बारगळल्याची चर्चा आहे.
दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी नगरविकास खात्याकडून काँग्रेसच्या नगर पालिका आणि महानगर पालिकांना निधी कमी मिळाला असल्याचे सांगितलं होतं. मात्र, आगामी अर्थसंकल्पात ही त्रुटी दूर केली जाईल, असंही थोरात म्हणाले आहेत. आमच्याकडे असलेल्या खात्यांवरील अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असल्याचेही ते म्हणाले.