नाशिक : काँग्रेसच्या लीगल सेलचे ‘लोकशाही बचाव’ आंदोलन
By श्याम बागुल | Published: March 31, 2023 03:31 PM2023-03-31T15:31:33+5:302023-03-31T15:31:49+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘लोकशाही बचाव’ आंदोलन करण्यात आले.
नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी केंद्र सरकार दडपशाहीचा अवलंब करत असल्याचे म्हणत निषेथार्थ ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस महाराष्ट्र तसेच जिल्हा युवक काँग्रेसच्या लीगल सेलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘लोकशाही बचाव’ आंदोलन करण्यात आले.
राहुल गांधी यांची खासदारकी मोदी सरकारने षडयंत्र रचून रद्द केली. देशभर काढलेल्या पदयात्रेनंतर जनाधार वाढल्यामुळे राहुल गांधी यांनी लोकसभेत अदानी-मोदीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला प्रश्न विचारले. त्यामुळे विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
यावेळी केंद्र सरकारविरोधात फलकबाजी व घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस लीगल सेलचे ॲड. सागर वाहुळ, ॲड. कोनिक कोठारी, शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड, डॉ. हेमलता पाटील, डॉ. वसंत ठाकूर, हनीफ बशीर, बबलू खैरे. ॲड. अमोल पठाडे, ॲड. एस. यू. सय्यद, ॲड. शुभंकर आव्हाड, ॲड. कीर्ती राठोड आदि उपस्थित होते