हाथरस येथे सामूहिक बलात्कार प्रकरणी कोटमगाव चौफुलीवर केला रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 06:50 PM2020-10-01T18:50:47+5:302020-10-01T18:52:19+5:30
लासलगाव : हाथरस येथे सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी व राहुल गांधी यांच्या गाड्या उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्याने थेट पायी निघालेल्या या दोघांना धक्काबुक्की करत ताब्यात घेण्यात आल्याच्या निषेधार्थ लासलगाव येथे नाशिक जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील कोटमगाव चौफुलीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री आदिनाथ योगी आणि भाजपविरोधी घोषणाबाजी करत रास्ता रोको केला.
लासलगाव : हाथरस येथे सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी व राहुल गांधी यांच्या गाड्या उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवल्याने थेट पायी निघालेल्या या दोघांना धक्काबुक्की करत ताब्यात घेण्यात आल्याच्या निषेधार्थ लासलगाव येथे नाशिक जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील कोटमगाव चौफुलीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री आदिनाथ योगी आणि भाजपविरोधी घोषणाबाजी करत रास्ता रोको केला. यावेळी वाहनांच्या लांब रांगा लागल्या.
२ आॅक्टोबर रोजी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत धरणे आंदोलनप्रसंगी येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.१) आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरीविरोधी बिलाविरोधात निषेध करत राहुल गांधी यांना धक्का बुक्की झाल्याप्रकरणी लासलगाव-विंचूर चौफुलीवर रास्ता रोको करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे, नाशिक शहर अध्यक्ष शरद आहेर, राजाभाऊ शेलार, जिल्हा सरचिटणीस दिगंबर गिते, रमेश कहांडळ, भैया देशमुख, प्रकाश अडसरे, साहेबराव ढोमसे, मधुकर शेलार, गुणवंत होळकर, डॉ. विकास चांदर, सचिन होळकर, मिरण पठण, योगेश डुकरे, सुहास सुरळीकर, सुनील निकाळे, सचिन खरताळे, अस्लम पठाण, सतीश पवार आदी उपस्थित होते.