मोदी सरकारपासून शंभर दिवसात सर्वसामान्यांची सुटका होईल- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 09:27 AM2019-01-21T09:27:11+5:302019-01-21T09:29:37+5:30
विरोधकांच्या एकजुटीची खिल्ली उडवणाऱ्या मोदींना राहुल गांधींचं प्रत्युत्तर
नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. विरोधक त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आटापिटा करत आहेत, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या एकजुटीची खिल्ली उडवली होती. त्याला राहुल यांनी उत्तर दिलं. देशाच्या जनतेची मोदी सरकारपासून 100 दिवसांत सुटका होईल, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं.
शनिवारी कोलकात्यामध्ये विरोधकांची महारॅली होती. यामध्ये देशभरातील 18 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. विरोधकांच्या या रॅलीची मोदींनी खिल्ली उडवली. 'स्वत:च्या अस्तित्वासाठी विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व पक्ष बचाव, बचाव ओरडत आहेत,' अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांच्या एकीला चिमटा काढला. मोदींच्या या विधानाला राहुल यांनी उत्तर दिलं. 'महामहिम, मदतीची याचना देशातील लाखो बेरोजगार तरुण, संकटग्रस्त शेतकरी, वंचित दलित आणि आदिवासी, त्रस्त अल्पसंख्यांक, उद्ध्वस्त झालेले व्यापारी करत आहेत. ते तुमच्या अत्याचार आणि अक्षमतेपासून मुक्त होण्यासाठी मदतीचं आवाहन करत आहेत. ही मंडळी 100 दिवसांमध्ये मुक्त होतील,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Your Highness,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 20, 2019
The cries for help are the cries of millions of unemployed youth; of farmers in distress; of oppressed Dalits & Adivasis; of persecuted minorities; of small businessmen in ruin; begging to be freed from your tyranny & incompetence.
In 100 days they will be free. https://t.co/sasW1IetWO
महाराष्ट्र आणि गोव्यातील भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोदींनी विरोधकांच्या एकजुटीवर भाष्य केलं होतं. ज्या मंचावरुन ही मंडळी देश आणि लोकशाही वाचवण्याची भाषा करत होती, त्याच मंचावर एका नेत्यानं बोफोर्स घोटाळ्याचा उल्लेख केला. अखेर सत्य कधी लपतं का?, असा सवाल मोदींनी विचारला. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा केवळ एक आमदार आहे. मात्र तरीही ते आम्हाला घाबरतात. कारण आम्ही सत्याच्या मार्गानं चालतो, असं मोदी म्हणाले.