14 राज्ये, 355 जागा: राहुल गांधी पदयात्रेतद्वारे PM मोदींचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 03:15 PM2023-12-27T15:15:41+5:302023-12-27T15:16:30+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेनंतर आता 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. मणिपूर ते मुंबई असा यात्रेचा मार्ग असेल.
Bharat Jodo Yatra: लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. काँग्रेसदेखील गुरुवारी नागपुरातून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजवणार आहेत. तसेच, पुढील महिन्यापासून राहुल गांधी भारत जोड यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यावर रवाना होत आहेत. राहुल गांधी 14 जानेवारीला मणिपूरपासून यात्रा सुरू करतील तर 20 मार्चला मुंबईत यात्रेचा समारोप होईल.
गेल्या वर्षी भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर, असा सुमारे 3900 किलोमीटरचा प्रवास केला होता. काँग्रेसने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदयात्रा काढली होती. राहुल यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा गेल्या वर्षी 7 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये संपली. यादरम्यान, राहुल गांधींनी 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रवास केला. या दौऱ्याचा दक्षिण भारतात काँग्रेसला राजकीय फायदा झाला.
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, 'भारत जोडो यात्रे'नंतर आता काँग्रेस पक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 'भारत न्याय यात्रा' काढणार आहे. यादरम्यान, मणिपूर ते मुंबई 6200 किलोमीटरचा प्रवास 67 दिवसांत करणार आहेत. यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात पूर्व-पश्चिम, असा 14 राज्यांमधील लोकसभेच्या 355 जागा जिंकण्यावर काँग्रेसचा फोकस आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. त्यामुळे या यात्रेद्वारे राहुल गांधी काँग्रेस आणि इंडिया आघाडीला राजकीय जीवदान देऊ शकतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या राज्यातून जाणार
राहुल गांधीची यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, यूपी, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार आहे. जयराम रमेश म्हणाले की, भारत जोड यात्रेदरम्यान राहुल गांधींनी आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय हुकूमशाही, हे तीन मुद्दे उपस्थित केले होते. यावेळी भारत न्याय यात्रेत आर्थिक न्याय, सामाजिक न्याय आणि राजकीय न्याय असेल.