केरळमध्ये काँग्रेसच्या दोन तरुण कार्यकर्त्यांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 12:05 PM2019-02-18T12:05:36+5:302019-02-18T12:12:44+5:30
केरळच्या कासरगोड येथे काँग्रेस पार्टीच्या दोन तरुण कार्यकर्त्यांची कथित स्वरुपात हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कासरगोड (केरळ) - केरळच्या कासरगोड येथे काँग्रेस पार्टीच्या दोन तरुण कार्यकर्त्यांची कथित स्वरुपात हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी दोन तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांची हत्या केली. पोलीस अधिकाऱ्यांनुसार, रविवारी रात्री (17 फेब्रुवारी) जवळपास 8 वाजण्याच्या सुमारास काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. कृपेश आणि सारत लाल (वय 24 वर्ष) अशी हत्या करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांची नाव आहेत. या हत्याकांडाबाबत कसून चौकशी सुरू आहे.
या दुहेरी हत्याकांडावरुन काँग्रेस नेता रमेश चेन्निथला यांनी माकपावर निशाणा साधला आहे. ''लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माकपाकडून रचण्यात आलेला हा कट आहे'', असा थेट आरोपही चेन्निथला यांनी केला आहे. दरम्यान, या हत्याकांडमध्ये आमच्या पार्टीची कोणतीही भूमिका नाही, असे म्हणत माकपाचे जिल्हा सचिव एम.व्ही.बालाकृष्णन मास्टर यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.
'आम्ही या हत्याकांड प्रकरणाचा तीव्र निषेध करतो. यामध्ये आमची कोणत्याही प्रकारची भूमिका नाही', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
(कारमध्ये गळा आवळून पँथरचे शहराध्यक्ष असलेल्या उद्योजकाचा खून)
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी ट्विटरच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या हत्येचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. ''जोपर्यंत हल्लेखोर पकडले जात नाहीत तोपर्यंत काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हत्येचं प्रकरण स्तब्ध करणारे आहे. पक्ष त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे.'', असे ट्विट करत राहुल गांधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
The brutal murder of two members of our Youth Congress family in Kasargod, Kerala is shocking. The Congress Party stands in solidarity with the families of these two young men & I send them my deepest condolences. We will not rest till the murderers are brought to justice.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 18, 2019