2019 ठरणार राजकीय घडामोडींचे वर्ष, लोकसभेबरोबरच या राज्यांमध्ये होणार विधानसभा निवडणुका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 10:37 AM2019-01-01T10:37:57+5:302019-01-01T10:39:31+5:30

लोकसभा निवडणूक आणि विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे नवे वर्ष हे राजकीय घडामोडींचे वर्ष ठरणार आहे. विशेषत: लोकसभा निवडणुकीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2019 will be the year of political developments, along with Lok Sabha and Assembly elections in these states | 2019 ठरणार राजकीय घडामोडींचे वर्ष, लोकसभेबरोबरच या राज्यांमध्ये होणार विधानसभा निवडणुका

2019 ठरणार राजकीय घडामोडींचे वर्ष, लोकसभेबरोबरच या राज्यांमध्ये होणार विधानसभा निवडणुका

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक आणि विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे नवे वर्ष हे राजकीय घडामोडींचे वर्ष ठरणार आहेविशेषत: लोकसभा निवडणुकीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे2019 मध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओदिशा, झारखंड, हरयाणा, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या  आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत

मुंबई - 2019 या नववर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. हे नवे वर्ष राजकीय, सामाजिक, क्रीडाक्षेत्रासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. विशेषत: लोकसभा निवडणूक आणि विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे नवे वर्ष हे राजकीय घडामोडींचे वर्ष ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होईल. या आठ राज्यांपैकी चार राज्यांमध्ये सध्या भाजपाची तर इतर तीन राज्यात प्रादेशिक पक्षांची सत्ता आहे. 

यावर्षी होणारी 17व्या लोकसभेची निवडणूक हे भारतातील राजकीय क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची घटना ठरणार आहे. मार्च ते मे महिन्यांदरम्यान लोकसभा निवडणुकीची घोषणा, मतदान आणि मतमोजणी आदी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर असलेले भाजपा सरकार आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होऊ घातलेली महाआघाडी यांच्यात सत्तेसाठी लढाई रंणारा आहे. या निवडणुकीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीचे निकाल त्रिशंकू लागल्यास गैर भाजपा आणि गैर काँग्रेसी नेत्यालाही पंतप्रधान पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. 

या राज्यांमध्ये होणार विधानसभा निवडणुका 

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओदिशा, झारखंड, हरयाणा, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या  आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पैकी महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे या राज्यातील सत्ता राखण्याचे आव्हान भाजपासमोर असेल. तर आँध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम, ओदिशामध्ये बीजू जनता दल आणि सिक्कीममध्ये एसडीएफ हे पक्ष सत्तेवर आहेत. या पक्षांचीही आपापल्या राज्यात सत्ता राखताना कसोटी लागेल. तर राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्येही यावर्षी विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्र
महाराष्ट्रामध्ये सध्या भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आहे. मात्र दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेद आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत युती तुटल्यास ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी जड जाऊ शकते. तर 2014 साली झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष सत्तेत पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच राज ठाकरेंचा मनसेही या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याची शक्यता आहे. 

आंध्र प्रदेश 
आंध्र प्रदेशमध्ये सध्या चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली तेलुगू देसम पक्षाचे सरकार आहे.  तेलुगु देसम पक्षाने  आगामी निवडणुकांसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षांसमोर माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसचे आव्हान आहे. 

ओदिशा 
ओदिशामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नवीन पटनाईक यांनी आपले एकहाती वर्चस्व राखले आहे. त्यांचा बीजू जनता दल पक्ष सुमारे 18 वर्षांपासून सत्तेवर आहे. मात्र यावेळी त्यांच्या पक्षाला भाजपाकडून आव्हान मिळण्याची शक्यता आहे. 

झारखंड 
झारखंडमध्ये 2014 पासून भाजपाची सत्ता आहे. दरम्यान, यावेळी काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने येथील सत्ता राखताना भाजपाची कसोटी लागणारा आहे. 

हरयाणा 
राजधानी नवी दिल्लीशेजारी असलेल्या हरयाणामध्ये  2014 मध्ये मोदीलाटेवर स्वार होत भाजपाने बहुमत मिळवले होते. मात्र यावेळी भाजपासमोर काँग्रेस आणि आयएनएलडी यांचे कडवे आव्हान असणार आहे. 

जम्मू काश्मीर 
जम्मू काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू असून, येथेही या वर्षात निवडणुका होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी आणि नॅशनल काँन्फ्रन्ससह भाजपा आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत आहे. 

सिक्कीम 
भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक असलेल्या सिक्कीममध्ये एसडीएफ आणि एसकेएम या स्थानिक पक्षांचा बोलबाला आहे. येथे भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांचे अस्तित्व फारसे दिसून येत नाही. 

अरुणाचल प्रदेश 
2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अरुणाचल प्रदेशमध्ये बाजी मारली होती. मात्र नंतर झालेल्या राजकीय उलथापालथीत येथील सत्ता काँग्रेसला गमवावी लागली होती. सध्या येथे भाजपाची सत्ता आहे.  

Web Title: 2019 will be the year of political developments, along with Lok Sabha and Assembly elections in these states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.