तीन राज्यांचे मुख्यमंत्री आज घेणार शपथ, सोहळ्यासाठी २१ पक्षांचे नेते

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 05:56 AM2018-12-17T05:56:13+5:302018-12-17T07:12:20+5:30

तीन मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी : राहुल गांधी, शरद पवार, देवेगौडा, येचुरींचीही उपस्थिती

21 party leaders for the swearing-in ceremony | तीन राज्यांचे मुख्यमंत्री आज घेणार शपथ, सोहळ्यासाठी २१ पक्षांचे नेते

तीन राज्यांचे मुख्यमंत्री आज घेणार शपथ, सोहळ्यासाठी २१ पक्षांचे नेते

Next

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी १७ डिसेंबर रोजी होत असून, २१ विरोधी पक्षांचे नेते या तिन्ही शपथविधी समारंभांना उपस्थित राहणार असल्यामुळे विरोधकांच्या ऐक्याचे नवे पर्व आकार घेईल. सध्या या विरोधी पक्षांचा गट जी-२१ नावाने ओळखला जात असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार आगामी लोकसभा निवडणुकीत खाली खेचण्यासाठी हा एकत्र आला आहे. राजकारणात अस्पृश्य असलेल्या आम आदमी पक्षाला (आप) काँग्रेसने या शपथविधी समारंभांसाठी औपचारिक निमंत्रण दिले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू, जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी हे त्यांचे वडील एच.डी. देवेगौडा यांच्यासह या तिन्ही शपथविधींना उपस्थित राहतील.

अशोक गेहलोत जयपूरमध्ये सकाळी १०.३० वाजता, तर कमलनाथ भोपाळमध्ये दुपारी १.३० वाजता व रायपूरमध्ये भूपेश बघेल हे सायंकाळी ४.३० ते ५ वाजेदरम्यान मुख्ममंत्रीपदाची शपथ घेतील. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह शरद पवार, प्रफुल्ल पटेल, माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा आणि इतर नेते तिन्ही शपथविधींना चार्टर्ड विमानांनी हजर राहतील. बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी शपथविधींना हजर राहण्यास आपली असमर्थता व्यक्त केली. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव लखनौमध्ये असतील. मायावती व यादव यांच्या पक्षांनी मध्यप्रदेशमध्ये विनाअट पाठिंबा दिला होता. भोपाळमधील शपथविधीला या दोघांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेत्या सोनिया गांधी या प्रकृतीच्या कारणांमुळे हजर राहणार नाहीत.

विरोधी पक्षांच्या एकजुटीचा विजय
च्द्रमुकचे एम.के. स्टालिन हे तिन्ही ठिकाणी हजर राहतील. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासह काँग्रेसचे सगळे मुख्यमंत्री आणि इतर नेते शपथविधी समारंभांना उपस्थित राहतील. काँग्रेसला शपथविधी समारंभांच्या माध्यमातून हे दाखवायचे आहे की, हा विरोधी पक्षांचा विजय आहे. बसप आणि समाजवादी पक्षाने सरकारमध्ये सहभागी व्हावे असा काँग्रेसचा जोरदार प्रयत्न आहे.
 

Web Title: 21 party leaders for the swearing-in ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.