३ जी: गांधी थिम, गांधी आणि गडकरी! प्रजासत्ताक दिनी राजपथवर अनोखे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 06:09 AM2019-01-27T06:09:19+5:302019-01-27T06:10:04+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधींची थिम, राहुल गांधी आणि नितीन गडकरी असा ‘थ्री जीं’ चा अनोखा संगम आज राजपथवर पहायला मिळाला.

3G: Gandhi Theim, Gandhi and Gadkari! Unique Philosophy on Republic Day | ३ जी: गांधी थिम, गांधी आणि गडकरी! प्रजासत्ताक दिनी राजपथवर अनोखे दर्शन

३ जी: गांधी थिम, गांधी आणि गडकरी! प्रजासत्ताक दिनी राजपथवर अनोखे दर्शन

Next

- विकास झाडे 

नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधींची थिम, राहुल गांधी आणि नितीन गडकरी असा ‘थ्री जीं’ चा अनोखा संगम आज राजपथवर पहायला मिळाला. एकिकडे गांधी जीवन दर्शन होत होते तर दुसरीकडे राहुल गांधी आणि नितीन गडकरी यांच्यातील चर्चेने अनेकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले होते.

गांधीजींची विचारधारा स्वीकारल्याशिवाय देशाला आणि जगाला पर्याय नाही असा बिगुल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्ट २०१४ रोजी लाल किल्यावरुन फुंकला होता. त्या निमित्ताने हातात झाडू घेण्याची मोहीम सुरू झाली. कधी नव्हे तो अनेक मंत्री - खासदारांच्या हातात झाडू दिसला. देश स्वच्छ ठेवण्यात आपण किती यशस्वी झालोत हा आता चर्चेचा, वादाचा आणि राजकारणाचा विषय आहे. परंतु कॉँग्रेसचे गांधीजी मोदींनी लीलया पळविले. कॉँग्रेसी मात्र ‘आ’ वासून पाहात राहिले. मोदी गांधीजींच्या चरख्यापासून तर शौचालयापर्यंत पोहचले.

गांधीजींचा वापर राजकारणासाठी होतो म्हणून टीकाही झाली. परंतु मोदींनी कुणाचीही पर्वा न करता गांधीजींना घट्ट पकडून ठेवले. मोदी सरकारच्या अंतिम टप्प्यातील राजपथवरील प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अत्यंत महत्त्वाचा होता. गांधीजींचे शतकोत्तर सुवर्ण जयंती वर्ष असल्याने देशातील १६ राज्यांनी आणि ६ केंद्रीय मंत्रालयाच्या चित्ररथांनी गांधीजींचा विचार सादर करणारे चित्ररथाचे सादरीकरण केले. पहिल्यांदाच असे घडले.

सर्व चित्ररथांची थिम महात्मा गांधी असल्याने संपूर्ण वातावरण गांधीमय झाले होते. आजच्या सोहळ्याला मुख्य अतिथी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामफोसा हेसुध्दा मोदी सरकारच्या गांधी प्रेमाने भारावून गेले असतील. काहीही असो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याचे श्रेय द्यायलाच हवे.

आज राजपथवर आणखी एक अनोखे चित्र पहायला मिळाले. कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांना मागच्या वर्षी सहाव्या रांगेतील आसन दिले होते. अमित शहा हे पहिल्या रांगेत बसून राहुल गांधींचे काय चालले म्हणून वळून पहात असल्याचेही कॅमेऱ्यांनी टिपले होते. त्यावर टीकाही झाली. यंदा मात्र सुधारणा करण्यात आली. राहुल गांधी यांना व्हीआयपींच्या पहिल्या रांगेतील आसन दिले गेले. त्यांच्या शेजारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. दोघेही दीड तास एकमेकांना असे खेटून बसले होते की ‘जय-विरु’ची जोडी शोभावी. दोघेही सारखे बोलत होते.

गांधी आणि गडकरी यांच्यातील संवाद काय सुरु होता ते कळायला मार्ग नव्हता. मात्र, कॅमेऱ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळून होत्या. राहुल गांधी यांना मोदी सरकारमध्ये आवडणारे एकमेव मंत्री गडकरी आहेत. काम करणारे मंत्री म्हणून त्यांनी गडकरींचा उल्लेखही केला होता. व्यक्ती कोणत्याही पक्षातील असो गडकरी लगेच त्यांच्यात मिसळतात. त्यामुळेच गडकरी सर्वांमध्ये लोकप्रिय आहेत. सध्या निवडणुकीचे वारे सुरु आहेत. २०१९ मध्ये नवा पंतप्रधान कोण, यावर जोरात चर्चा आहे. कॉँग्रेसने बाजी मारली तर राहुल गांधी आणि भाजपचे सरकार होणार असेल तर पंतप्रधान गडकरीच, असे समीकरण सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजपथवरील कार्यक्रम आटोपल्यानंतर जवळपास १५-२० मिनिटे लोकांच्या जवळ जात हात हलवून अभिवादन केले. पुढच्या वर्षी अभिवादन करण्याची संधी गांधी, गडकरी किंवा गांधी थिम साकारणाºया मोदींना मिळते काय याची प्रतीक्षा करू या!
 

Web Title: 3G: Gandhi Theim, Gandhi and Gadkari! Unique Philosophy on Republic Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.