मोदी मॅजिक कायम! 48% देशवासीयांची पसंती; राहुल गांधी दुसऱ्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 08:32 AM2018-09-04T08:32:37+5:302018-09-04T08:38:30+5:30
ऑनलाईन सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी अव्वल
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अद्याप कायम असल्याचं एका ऑनलाईन सर्वेक्षणातून समोर आलं आहे. देशातील 712 जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात 48 टक्के जनतेनं मोदींना कौल दिला आहे. मोदींच्या नेतृत्त्वाखाली देश प्रगती करेल, असं जवळपास निम्म्या लोकांना वाटतं. राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी संबंधित इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीनं केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात 57 लाख लोकांनी त्यांची मतं नोंदवली.
नॅशनल एजेंडा फोरमच्या अंतर्गत इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीनं (आय-पॅक) केलेल्या सर्वेक्षणात 923 नेत्यांचे पर्याय देण्यात आले होते. यामध्ये मोदींना 48 टक्के जनतेनं पसंती दिली. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 11 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (9.3 टक्के), उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (7 टक्के), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (4.2 टक्के), बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती (4.1 टक्के) यांचा क्रमांक लागतो. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांना ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी सीताराम येचुरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक नेत्यांचे पर्याय देण्यात आले होते.
देशासमोरील प्रमुख समस्या कोणत्या, याबद्दलही लोकांना सर्वेक्षणातून विचारणा करण्यात आली होती. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांनी महिला सशक्तीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, आर्थिक असमानता, आरोग्य सेवांचा दर्जा या देशासमोरील मोठ्या समस्या असल्याचं मत नोंदवलं. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि पत्रकार रवीश कुमार यांनी राजकारणात यायला हवं, असं मत नोंदवणाऱ्याचं प्रमाणदेखील लक्षणीय होतं.