सरकारी नोकऱ्यांत महिलांना ५० टक्के आरक्षण देणार, काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 05:43 AM2024-03-30T05:43:31+5:302024-03-30T06:55:17+5:30
दर दहा महिलांमध्ये फक्त एकाच महिलेला सरकारी नोकरी मिळते. हे असे चित्र का आहे? असाही सवाल राहुल गांधी यांनी केला.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांत काँग्रेस सत्तेवर आल्यास सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण ठेवण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी दिले. देशात सध्या दर तीनपैकी फक्त एका महिलेच्याच हातात रोजगार आहे; तसेच दर दहा महिलांमध्ये फक्त एकाच महिलेला सरकारी नोकरी मिळते. हे असे चित्र का आहे? असाही सवाल राहुल गांधी यांनी केला.
यासंदर्भात सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, देशातील लोकसंख्येत महिलांचे प्रमाण ५० टक्के आहे; मात्र उच्च माध्यमिक, उच्च शिक्षणाचा लाभ सर्व ५० टक्के महिलांना मिळतो असे चित्र अजिबात दिसत नाही. या महिलांना कमी प्रमाणात सुविधा का मिळतात, याचा विचार व्हायला हवा.
राहुल गांधी म्हणाले की, ‘आधी आबादी, पुरा हक’ हे काँग्रेसचे धोरण आहे. सरकार चालविण्यात महिलांचे समान योगदान असायला हवे. तेव्हाच महिलांच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेता येणे शक्य होईल. संसदेत, विधिमंडळात महिलांसाठी आरक्षण तत्काळ लागू व्हावे, असे काँग्रेसचे मत आहे. सबलीकरण झालेल्या महिला देशाचे भविष्य घडवतील, असेही राहुल गांधी म्हणाले.