काँग्रेसच्या यादीला आव्हान? अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 12:41 PM2022-09-06T12:41:39+5:302022-09-06T12:42:38+5:30
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. परंतु यासाठी मतदान करणाऱ्या मतदारांची यादी मात्र जाहीर करण्यात आलेली नाही.
सुरेश भुसारी
नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी असलेल्या मतदारांची यादी उपलब्ध न झाल्यास याविरोधात न्यायालयात दाद मागण्यासाठी नाराज गटातील काही नेते पुढे सरसावल्याचे समजते. यासंदर्भात आज महाराष्ट्र सदनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. परंतु यासाठी मतदान करणाऱ्या मतदारांची यादी मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी मतदान करणाऱ्या किमान १० सदस्यांचे अनुमोदन अध्यक्षपदाच्या उमेदवाराला आवश्यक आहे. ही मतदार यादीच जाहीर झालेली नसल्याने या निवडणुकीसाठी मतदार कोण? हे गुपित आहे.