‘इंडिया’च्या बाजूने देशात छुपी लाट! भाजप १८० नव्हे १५० जागा जिंकेल : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 05:35 AM2024-04-18T05:35:59+5:302024-04-18T05:37:21+5:30
राहुल गांधी यांनी बुधवारी निवडणूक रोख्यांना जगातील सर्वांत मोठी खंडणी योजना म्हणून संबोधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
गाझियाबाद (उत्तर प्रदेश) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी निवडणूक रोख्यांना जगातील सर्वांत मोठी खंडणी योजना म्हणून संबोधत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. विरोधी ‘इंडिया’ आघाडीच्या बाजूने एक छुपी लाट आहे आणि लोकसभा निवडणुकीत भाजप १५० जागांपर्यंत मर्यादित राहील, असा दावाही त्यांनी केला.
येथे सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासमवेत पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, निवडणुकीत बेरोजगारी, महागाई यासारखे मोठे मुद्दे आहेत; परंतु भाजप त्यांच्यापासून जनतेचे लक्ष हटवण्यात गुंतलेला आहे. ते मुद्द्यांवर बोलत नाहीत. राजकारण स्वच्छ करण्यासाठी पारदर्शकतेसाठी निवडणूक रोखे आणल्याचा दावा केला जातो, परंतु तसे असेल तर सर्वोच्च न्यायालयाने ते का बंद केले, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस-सपा आघाडी चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. १५-२० दिवसांपूर्वी भाजप १८० जागा मिळतील, असे वाटत होते. आता फक्त १५० जागांपर्यंत जातील, असे दिसते. आम्हाला प्रत्येक राज्यातून अहवाल मिळत आहेत की, आमची स्थिती मजबूत होत आहे आणि ‘इंडिया’च्या बाजूने एक सुप्त लाट आहे, असे ते म्हणाले.
...तर अमेठीतून लढणार
उत्तर प्रदेशातील अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवण्याविषयी राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले की, अमेठीबाबत पक्ष निर्णय घेईल. मला जो काही आदेश मिळेल, तो मी पाळेन. आमच्या पक्षात हे निर्णय सीईसी (केंद्रीय निवडणूक समिती) बैठकीत घेतले जातात.
ही निवडणूक दोन विचारसरणींतील लढाई
मंड्या (कर्नाटक) : आगामी लोकसभा निवडणूक ही दोन विचारसरणींमधील लढाई आहे, एकीकडे राज्यघटनेसाठी लढणारी इंडिया आघाडी आहे, तर दुसरीकडे राज्यघटना आणि लोकशाही संपुष्टात आणू पाहणारी भाजपा आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी बुधवारी येथील प्रचारसभेत केली.